फ्रान्समधील एका चोरीमुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. राजधानी पॅरिसमध्ये आज मुखवटा घातलेले चोर लुव्र संग्रहालयात शिरले आणि अवघ्या काही क्षणात मौल्यवान दागिने चोरून पळून गेले. चोरांनी ही चोरी अवघ्या सात मिनिटांमध्ये केली. इतक्या कमी वेळात दागिने लंपास करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. आता या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पॅरिसमधील लुव्र संग्रहालय हे जगातील सर्वात जास्त लोकप्रिय संग्रहालय आहे. येथे नेहमी सतत पर्यटकांची वर्दळ पहायला मिळते. हे सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक आहे. या संग्रहालयात जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र आहे. आता याच संग्राहालयात चोरी झाल्याने फ्रेंच प्रशासनाने संग्रहालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी 9:30 ते 9:40 या कालावधीत घडली. गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी याबाबत बोलताना सागितले की, ही संपूर्ण घटना अवघ्या सात मिनिटांत घडली. चोरांनी बाहेरून चेरी पिकर (हायड्रॉलिक शिडीसारखे मशीन) वापरून संग्रहालयात प्रवेश केला आणि मौल्यवान दागिने चोरले. या घटनेत तीन ते चार लोकांचा सहभाग होता. या चोरांनी चोरी करण्यापूर्वी संग्रहालयाची रेकी केली होती. ही चोरी अतिशय सावधगिरीने आणि अभ्यासपूर्वक केली आहे. कारण चोरट्यांनी काच कापण्यासाठी डिस्क कटरचा वापर केला.’
ले पॅरिसियनने दिलेल्या वृत्तानुसार, लुव्र संग्रहालयातील नेपोलियन आणि महाराणीच्या दागिन्यांच्या संग्रहातून 9 दागिने चोरीला गेले आहेत. यातील एक दागिना संग्रहालयाच्या बाहेर तुटलेल्या अवस्थेत आढळला. हा दागिन्याचा तुकडा राणी युजेनी डी मोंटिजोच्या मुकुटातील असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सीन नदीच्या बाजूने गॅलरीमध्ये प्रवेश केला. यासाठी चोरट्यांनी बास्केट लिफ्टचा वापर केला.या भागात बांधकाम सुरू होते. त्यानंतर चोरट्यांनी डिस्क कटरने खिडक्या कापल्या आणि आत प्रवेश केला. त्यानंतर नऊ दागिने चोरले आणि ते पळून गेले. आता त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
या चोरीबाबत बोलताना पॅरिस सेंटरचे महापौर एरियल वेइल म्हणाले की, ‘लुव्र संग्रहालयात इतक्या सहजपणे चोरी होणे हे धक्कादायक आहे. आतापर्यंत आपण अशा गोष्टी चित्रपटांमध्ये पाहिले आहे, मात्र चोरट्यांनी ते प्रत्यक्षात केले आहे.’