दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा !
esakal October 20, 2025 01:45 AM

दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा!
नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : दिवाळीचा सण म्हणजे फटाके, दिवे आणि सजावट. दिवाळी सणाचा आनंद लुटताना फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सण साजरा करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे भाजण्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत ऐरोलीतील नॅशनल बर्न्स सेंटर आणि बर्न्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि इमारतींपासून दूर उडवावेत. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे आणि त्यांना फटाके हाताळू देऊ नयेत. लहान मुलांच्या हातात कधीही फुलबाज्या देऊ नयेत, सूती आणि अंगाला घट्ट बसणारे कपडे परिधान करावेत, तसेच जवळच थंड पाण्याची बादली ठेवावी, अशा सूचना तज्ज्ञांकडुन करण्यात आल्या आहेत. फटाके हातात धरून पेटवू नयेत, फटाके जमिनीवर ठेवूनच बाजूने पेटवावेत, तसेच न पेटलेल्या फटक्याजवळ त्वरित जाऊ नये, कारण ते उशिरा फुटून अपघात घडू शकते. घराच्या आत किंवा बंद जागेत कधीही फटाके, मेणबत्त्या वा तेलाचे दिवे पेटवू नयेत, असा इशाराही तज्ञांकडुन देण्यात आला आहे. पाऊस फटाका पेटवताना, लहान फुलबाजी वापरल्यास हात जवळ राहतो आणि स्फोटाचा धोका वाढतो. त्यामुळे पाऊस (फाउंटन फटाका) पेटवताना १२ इंची फुलबाजी वापरावी, अशा सूचना तज्ज्ञांकडुन करण्यात आल्या आहेत.
...........
भाजल्यास काय करावे?
फटाक्यांमुळे भाजल्यास जोपर्यंत जळजळ कमी होत नाही, तोपर्यंत त्या भागावर थंड पाणी सतत ओतावे किंवा थंड पाण्यात बुडवून ठेवावे. भाजलेल्या जागेवर हळद, टूथपेस्ट, बर्फ किंवा शेण लावू नये. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, असे डॉ.सुनील केसवानी यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.