वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत इंग्लंडने भारताचा 4 धावांनी पराभव केला.. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर उपांत्य फेरीच्या आशा कायम राहतील. भारताचे या स्पर्धेत दोन सामने शिल्लक आहे. एक न्यूझीलंड आणि दुसरा बांगलादेशविरुद्ध… हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण न्यूझीलंडविरुद्धचा सामना करो या मरोची लढाई असेल. दरम्यान, इंग्लंडने 288 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या बलाढ्य आव्हानाचा सामना करताना भारतीय फलंदाज काय करणार याची उत्सुकता लागून होती. मधल्या फळीत भारतीय फलंदाजांनी डाव सावरला पण त्यानंतर गडगडला. भारताला 50 षटकात 6 गडी गमवून 284 धावा करता आल्या. हा सामना भारताने 4 धावांनी गमावला.
विजयी धावांचा पाठलाग करताना संघाच्या 13 धावांवर प्रतिका राऊल अवघ्या 6 धावा करून बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधानाने हरलीन देओलसोबत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 29 धावांची भागीदारी झाल्यानंतर हरलीन देओल 24 धावा करून बाद झाली. त्यानंतर उपकर्णधार स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या 125 धावांची भागीदारी केली. हरमनप्रती कौर 70 धावा करून बाद झाली. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांनी डाव पुढे नेला. या दोघांनी 67 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना 88 धावा करून बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्माने डाव सावरला आणि 57 चेंडूत 50 धावा केल्या आणि बाद झाली. त्यामुळे संघ अडचणीत आला. रिचा घोषही काही खास करू शकली नाही. 8 धावा करून तंबूत आली.
शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. अमनजोत कौर आणि स्नेह राणा मैदानात होत्या. प्रत्येक चेंडूवर धाकधूक वाढत होती. त्यामुळे काय होईल याची चिंता क्रीडाप्रेमींना लागून होती. पहिल्या चेंडूवर स्नेह राणाने एक धाव काढली. तसंच अमनजोतनेही एक धाव काढली. त्यामुळे 4 चेंडूत 12 धावा अशी स्थिती आली. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव काढत स्नेह राणाने अमनजोतला स्ट्राईक दिला. तीन चेंडू आणि 11 धावा त्यामुळे हा सामना हातून गेल्यातच जमा होता. कारण दोन षटकारांची गरज होती. त्यात चौथा चेंडू निर्धाव गेला आणि सर्व काही संपल्यातच जमा झालं. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दोन धावा काढत अमनजोतने स्ट्राईक स्वत:कडे ठेवला. सहाव्या चेंडूवर चौकार मारला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही.