डॉ. टॅमर गेफेन अमेरिकेतील इलिनॉयमधील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात सुपरएजिंग प्रोग्राममध्ये संशोधन करतात.
त्या ज्या सुपरएजर महिलेच्या मेंदूवर संशोधन करत होत्या, त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, डॉ. गेफेन यांचं संशोधन अजूनही सुरू आहे.
डॉ. गेफेन न्युरोसायकॉलॉजिस्ट आहेत.
त्यांचं म्हणण आहे, "त्यांचा हिप्पोकॅम्पस (मानवी मेंदूचा एक भाग) खूप सुंदर होता."
डॉ. टॅमर गेफेन म्हणतात, "त्यांचे न्युरॉन जाड आणि निरोगी होते. मला आठवतं की मी विचार केला होता की इतक्या सुंदर आणि गुंतागुंतीच्या रचनेमध्ये इतक्या वेदनादायी आठवणीदेखील राहू शकतात ही गोष्ट किती अद्भूत आहे."
अर्थात ती सुपरएजर महिला हॉलोकॉस्ट (नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार) मधून बचावलेली होती. मात्र, त्यांचं प्रसन्न राहणं, हिंमत आणि हास्य संशोधकांच्या लक्षात आहे.
डॉ. गेफेन म्हणाल्या, "आता दहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, आजदेखील मी त्यांच्याबद्दल विचार करते."
डॉ. गेफेन यांनी ही गोष्ट मार्टिन विल्सन यांना सांगितली. मार्टिन 'व्हॉट वी कॅन लर्न फ्रॉम सुपरएजर्स' नावाच्या लेखाचे लेखक आहेत. हा लेख नॉर्थवेस्टर्न मासिकात प्रकाशित झाला होता.
हा प्रोग्राम किंवा संशोधन 25 वर्षांपासून सुरू आहे. याचा अर्थ, वैज्ञानिक आणि यात भाग घेणाऱ्या लोकांचा प्रदीर्घ काळपासून परिचय आहे.
डॉ. गेफेन यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं आहे की ज्या लोकांनी त्यांचे मेंदू दान केले आहेत, त्यांच्याबरोबर हे नातं अधिक घनिष्ठ असू शकतं.
सुपरएजिंगशी निगडीत पहिलं प्रकरण'सुपरएजिंग' शब्द नॉर्थवेस्टर्न अल्झायमर डिसीज रिसर्च सेंटरमध्ये जन्माला आला होता.
सुपरएजिंग प्रोग्रामची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला 1990 च्या दशकाचा मध्य लक्षात घ्यावा लागेल. त्यावेळेस योगायोगानं एक घटना घडली होती.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी प्रोग्रामच्या पहिल्या 25 वर्षांवर आधारित लेखात वैज्ञानिकांनी लिहिलं होतं, "आम्हाला एका 81 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मेंदू मिळाला होता."
ही महिला आधी आणखी एका संशोधन प्रकल्पात सहभागी होती आणि 'कोणत्याही प्रकारचं काम करण्याची तिची क्षमता कमी झाल्याची कोणतंही चिन्हं नव्हतं.'
प्रत्यक्षात, मेमरी टेस्टमध्ये त्यांना त्यांच्या वयाच्या तुलनेत 'चांगले गुण' मिळाले होते. त्यांना जवळपास 50 वर्षांच्या लोकांइतके गुण मिळाले होते.
त्या महिलेच्या मेंदूतील अँटोरायनल कॉर्टेक्स भागात फक्त एक 'न्यूरोफिब्रिलरी टँगल' सापडल्यामुळे संशोधक आश्चर्यचकित झाले होते.
मेंदूचा हा भाग इतर अनेक क्षेत्रांशी जोडलेला असतो. असं मानलं जातं की हा भाग ठिकाणं, घटना आणि वैयक्तिक आठवणी जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
न्यूरोफिब्रिलरी टँगल हे टाऊ नावाच्या प्रोटीनचे अतिशय बारीक तंतूंचे गठ्ठे असतात. त्यांचा न्यूरॉन्यमध्ये आपसात गुंता होतो.
या टँगल्सचा मेंदूतील विस्तार आठवणी आणि विचार करण्याच्या - आकलन करण्याच्या क्षमतेमध्ये घट होण्याशी संबंध असल्याचं मानलं जातं.
संशोधकांच्या मते, त्या महिलेच्या मेंदूमध्ये फक्त टँगल्स सापडणं ही बाब 'त्या वयात खूपच दुर्मिळ स्वरूपाची होती. भलेही त्या वयातील व्यक्तीला स्मरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या नसली तरीही...'
डॉ. सँड्रा वाइनट्रॉब या संशोधनातील प्रमुख संशोधकांपैकी एक आहेत आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक आहेत. बीबीसीच्या हेल्थ चेक या कार्यक्रमात, त्यांनी या संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल सांगितलं.
त्या म्हणाल्या, "आमच्या संशोधनातील पहिल्या सुपरएजरच्या मेंदूत फक्त एक टँगल होता. आम्ही विचार केला, 'अरे देवा! आम्ही मेंदू निरोगी ठेवण्याचं रहस्य शोधलं आहे' - टँगल न होणं."
"मात्र, त्यापुढच्या सुपरएजरच्या मेंदूत तितकेच टँगल होते, जितके अल्झायमर आजार असलेल्या व्यक्तीच्या मेंदूत सापडतात."
सुपरएजर्स कोण आहेत?सुपरएजिंग प्रोग्रामशी संबंधित वैज्ञानिक म्हणतात की, सुपरएजर लोक म्हणजे ज्यांचं वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक असतं. मात्र, शब्दांची यादी आठवण्याच्या चाचणीमध्ये त्यांना 20 किंवा 30 वर्षे वयाच्या लोकांइतके गुण मिळतात.
ते यासाठी 'रे ऑडिटरी वर्बल लर्निंग टेस्ट'चा वापर करतात.
या चाचणीचा वापर न्यूरोसायकॉलॉजीमध्ये स्मरणशक्ती आणि इतर मानसिक क्षमतांचं मोजमाप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. आकलनाशी संबंधित इतर क्षमता जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांचा देखील वापर केला जातो.
वैज्ञानिकांनी 'एपिसोडिक मेमरी' म्हणजे घटना लक्षात ठेवण्याच्या क्षमतेला मुख्य मार्कर मानलं. कारण सामान्यपणे वाढत्या वयात हीच क्षमता सर्वाधिक कमी होऊ लागते.
त्यासाठी कोणाचंही 'सुपरएजर' गटात वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी खूप वरचा निकष निश्चित केला आहे. तो म्हणजे एखाद्या अशा व्यक्तीची स्मरणशक्ती असणं, ज्याचं वय किमान 30 वर्षे लहान असेल.
त्यानंतर समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.
मॉली ए. माथर, नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील सायकियाट्री आणि बिहेवियेरल सायन्सेसच्या असिस्टंट प्राध्यापक आहेत.
मॉली बीबीसीला म्हणाल्या, "90 वर्षांची एखादी व्यक्ती इतकी नवीन माहिती कशी काय स्मरणात ठेवू शकते, हे पाहणं आश्चर्यचकित करणारं असतं. कारण मी पाहते की 50 किंवा 60 वर्षे वयाच्या रुग्णांना कधीकधी यापेक्षाही सोप्या मेमरी टेस्टमध्ये अडचणी येतात."
सुपरएजर्सचे मेंदू वेगळे कसे असतात?सुपरएजर या मताला आव्हान देतात की वय वाढल्यावर स्मरणशक्ती किंवा विचार करण्याची क्षमता कमी होणं निश्चित असतं.
संशोधकांना आढळलं की सुपरएजर लोकांमध्ये अशा प्रकारच्या न्यूरोसायकॉलॉजिकल आणि न्यूरोबायोलॉजिकल वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे ते त्यांच्याच वयाच्या सामान्य लोकांपेक्षा वेगळे ठरतात.
उदाहरणार्थ, त्यांच्या 'कॉर्टिकल व्हॉल्यूम' म्हणजे मेंदूच्या बाहेरच्या थरात असलेल्या ऊतींचं प्रमाण वयानं 20 ते 30 वर्षे लहान असलेल्या लोकांसारखं असतं.
कॉर्टिकल व्हॉल्यूम मेंदूच्या बाहेरच्या थराशी संबंधित असतो. हाच भाग विचार करण्याच्या क्षमतेसाठी आवश्यक असतो.
मेंदूचा हा भाग स्मरणशक्ती आणि भाषा समजण्याच्या क्षमतांशी जोडलेला असतो.
आणखी एक रंजक शोध असा होता की सुपरएजर लोकांच्या मेंदूमध्ये 'वॉन इकॉनोमो न्यूरॉन'ची संख्या त्यांच्या साथीदारांच्या तुलनेत खूप जास्त असते. किंबहुना त्यांच्यापेक्षा खूप लहान लोकांपेक्षाही जास्त असते.
हे विशेष प्रकारचे न्यूरॉन, सामाजिक संबंध आणि गुंतागुंतीच्या सामाजिक वर्तनाला समजून घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
तज्ज्ञांनी सुपरएजर लोकांमध्ये पाहिलं आहे की त्यांना त्यांची नाती भक्कम ठेवायला आवडतं. हा नवा शोध या मुद्द्यासारखाच आहे.
माथर म्हणतात, "मात्र आम्हाला माहित नाही की आधी काय झालं - ते आधीपासूनच असे होते का की सामाजिक असल्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये हा बदल झाला?"
सेल्युलर स्तरावरदेखील सुपरएजरच्या मेंदूमध्ये अल्झायमरशी संबंधित समस्यांची चिन्हं खूप कमी प्रमाणात दिसतात.
माथर म्हणतात, "मला ही गोष्ट अत्यंत आश्चर्यकारक वाटते की यातील अनेकजण 80 किंवा 90 वर्षांचे आहेत. काहीजण तर 100 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्या मेदूंमध्ये टँगल्सचं प्रमाण खूप कमी आहे. प्रत्यक्षात सर्वसाधारणपणे या वयात आपल्याला त्यांची जास्त संख्या आढळून येते."
असं का होतं, हे अद्याप वैज्ञानिकांना माहित नाही.
वैज्ञानिकांना असंही वाटतं की बहुधा कोणतीतरी अशी प्रक्रिया आहे, जी हे टँगल्स तयार होण्यापासून रोखते.
ज्या सुपरएजर लोकांच्या मेंदूमध्ये टँगल्स आढळतात, त्यांची स्मरणशक्ती चांगली कशी राहते, हे अजूनही एक कोडं आहे.
वेगवेगळ्या सवयी1934 मध्ये जन्मलेले राल्फ रेबॉक हे या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांपैकी एक आहेत.
ते नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये म्हणतात, "मला सुपरएजर असण्याचा खूप अभिमान आहे."
या प्रोग्रामची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत त्यात 290 सुपरएजर यात सहभागी झाले आहेत. तर 77 मेंदूंवर त्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर संशोधन करण्यात आलं आहे. वय वाढूनदेखील त्यांची स्मरणशक्ती इतकी चांगली कशी काय होती, हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता.
सध्या या संशोधनात 133 जण सहभागी झालेले आहेत.
मार्टिन विल्सन यांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे की कोणताही 'सामान्य' सुपरएजर नसतो. त्याच्या उलट, यात खूप वेगवेगळ्या जीवनशैली असलेल्या लोकांचे गट आहेत.
संशोधकांच्या मते, "काही सुपरएजर असे होते, जे निरोगी आयुष्यासाठी जवळपास प्रत्येक सूचनेचं पालन करायचे."
"मात्र, काहीजण योग्य आहारदेखील घेत नव्हते. दारू प्याचे आणि सिगारेट ओढायचे. व्यायाम करत नव्हते. त्यांच्या आयुष्यात तणाव होता. ते नीट पूर्ण झोपदेखील घेत नव्हते."
त्यांनी पुढे लिहिलं आहे, "याचं कोणतंही सोपं सूत्र नाही. बहुधा एखाद्या दिवशी ते आपल्याला समजेल. मात्र, सध्या आपण त्यापासून खूप दूर आहोत."
डॉ. गेफेन इशारा देतात की, "नेहमी असं होईल की जीवशास्त्र, जेनेटिक्स आणि इतर घटकांचा परस्पर परिणाम होत राहील. तो एखाद्या व्यक्तीच्या मानसिक भक्कमपणामध्ये योगदान देतो."
डॉ. वाइनट्रॉब बीबीसीला म्हणाल्या, "फक्त योग्य आहार, चांगली झोप किंवा दारू सोडल्यामुळे कोणी अचानक सुपरएजर बनणार नाही."
"मात्र, आम्हाला माहित आहे की या गोष्टींचा वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळेच आमचा संदेश आहे की जितकं शक्य असेल, तितकी जोखीम कमी करावी. जर तुम्ही तसं केलं आणि तुमची जनुकंदेखील अनुकुल असतील, तर तुम्हाला सुपरएजर होण्याची संधी मिळू शकते."
मग आपले मेंदूदेखील सुपरएजरसारखे असू शकतात का?डॉ. वाइनट्रॉब बीबीसीला म्हणाल्या, "आपण पाहिलं त्याप्रमाणे, कोणताही 'सुपरएजर मेंदू' नसतो. प्रत्यक्षात सुपर त्यांची स्मरणशक्ती आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो."
त्या म्हणतात की, मृत्यूनंतर तपासणी केल्यावर काहीजणांच्या मेंदूमध्ये वयामुळे होणारी झीज किंवा हानी जवळपास नसतेच. मात्र, काहीजणांमध्ये अल्झायमर आजाराशी संबंधित एक विशिष्ट प्रोटीन आढळतं. हे प्रोटीन सामान्यपणे मेंदूतील निरोगी पेशींना अपाय करतं आणि स्मरणशक्ती कमी करतं.
डॉ. वाइनट्रॉब म्हणतात, "काही कारणास्तव सामान्य वृद्धांमध्ये जितक्या वेगानं हे प्रोटीन तयार होतं तितक्या वेगानं ते सुपरएजरमध्ये तयार होत नाही किंवा मग त्यांच्यात ते प्रोटीन तयार होतं. मात्र, त्यांच्यावर या प्रोटीनचा परिणाम होत नाही. हीच गोष्ट आम्हाला सर्वाधिक रोमांचित करते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)