आंधळगाव, ता. १८ : कोळगाव डोळस (ता. शिरूर) येथे नागरिकांचा विरोध धुडकावून लावत, बळाचा वापर करून रस्त्यावरच विद्युत खांब उभारण्याचा ‘प्रताप’ सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणाऱ्या आवादा कंपनीच्या ठेकेदाराने केला आहे. या कृतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाऊस पडत आहे. या प्रकरणी नागरिकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोळगाव डोळस येथे शासनाच्या कृषी सौर योजनेअंतर्गत गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील अतिरिक्त वीज शिरसगाव काटा येथे पाठवण्यासाठी कोळगाव येथील तुकाई वस्तीमार्गे नव्या विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे. मात्र, या वाहिनीच्या उभारणीदरम्यान संबंधित नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, उच्चदाब विद्युत वाहिनी अनेक ठिकाणी पूर्वीच्या वाहिन्यांना क्रॉस करत टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अनेक खांब थेट लोकवस्तीतील रस्त्यावरच उभारण्यात आले आहेत. लोकवस्तीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खांब उभारल्याने रस्ता अरुंद झाला आहे. भविष्यात रस्ता रुंद करण्याची कोणतीही शक्यता राहिलेली नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊसवाहतूक वर्षभर सुरू असते. दररोज ४० ते ५० विद्यार्थी या रस्त्याने शाळेत जात असतात. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने विद्युत खांब उभे असल्याने या अरुंद रस्त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शवत, ही विद्युत वाहिनी पर्यायी मार्गाने शेतांमधून नेण्याची विनंती केली. तथापि, ठेकेदाराने पोलिस बंदोबस्तासह काम सुरू ठेवत नागरिकांचा विरोध मोडून काढला. या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष असून ‘ही वाहिनी पर्यायी मार्गाने न्यावी व नागरिकांना न्याय द्यावा’, अशी मागणी केली आहे.