सासवड, ता. १९: पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करावी आणि जेजुरीचे साहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची बदली करावी, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ३०) धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सासवड व जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा, मटका, हातभट्टी दारू, जुगार, हुक्का पार्लर यांसारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. ७ जून २०२५ रोजी सासवड पोलिसांनी पकडलेला ट्रक कोणाच्या आदेशाने सोडला गेला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. सासवडचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. संबंधित पोलिस अधिकारी अवैध धंदे रोखण्यास अपयशी ठरले आहेत किंवा हप्ते घेऊन अशा व्यक्तींना पाठीशी घालत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. यापूर्वीही ब्रिगेडने टाळनाद आंदोलन, बेमुदत उपोषण आणि जागरण-गोंधळ आंदोलन करून वारंवार तक्रारी अर्ज दिले आहेत, मात्र अवैध धंदे थांबलेले नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडचे सरचिटणीस विष्णू भोसले, संघटक सचिव गोविंद जगताप यांसह सदस्यांनी हे निवेदन दिले असून याबाबत तत्काळ कार्यवाही न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.