बाजारभावाअभावी शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी
esakal October 20, 2025 06:45 AM

उंडवडी, ता. १८ : दिवाळीच्या सणाला चार पैसे कांद्याच्या पिकातून मिळतील, या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कांदा पिकवला. मात्र बाजारभाव नसल्याने कांद्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचा वांदा केला आहे. सध्या साठवलेला कांदा सडण्याच्या मार्गावर आल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागातील कारखेल (ता. बारामती) या एका गावातील तब्बल २५५ टनांहून अधिक कांदा वखारीत पडून आहे.

साठवलेल्या कांद्यापैकी सुमारे २५ टक्के कांदा सडला असून, बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट आहे. कारखेल येथील शेतकऱ्यांकडे साठवलेला कांदा पुढीलप्रमाणे आहे. काशिनाथ जगताप (२५ टन), उत्तम जगताप (१५ टन), चांगदेव जगताप (१५ टन), सतीश वाबळे (१५ टन), सुनील वाबळे (२५ टन), बापूराव जगताप (५० टन) राजहंस भापकर (१५ टन) आणि रमेश वाबळे (१० टन). एवढा कांदा पडून असूनही बाजारभाव मिळत नसल्याने “हा कांदा विकायचा तरी कुठे?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यांनी प्रतिएकर रुपये ३५ ते ४० हजार रुपये खर्च करून कांदा पिकवला, पण सध्या बाजारभाव फक्त रुपये ५ ते १० प्रतिकिलो मिळत आहे. या भावात उत्पादनाचा खर्चही भरून येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिक शेतकरी संघटना आणि प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर कांदा वाया जाण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

कांद्यामुळे यंदा डोळ्यात पाणी
यंदा कांदा पिकामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नगदी पीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कांद्यानेच या वर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शासनाने तातडीने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करावीत, शीतगृह सुविधांना अनुदान द्यावे, कांदा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडणारी यंत्रणा उभारावी.


आम्ही रात्रंदिवस काम केले, पण भाव नाही, विक्री नाही. आता कांदा सडतोय. दिवाळीची तयारी नाही, फक्त चिंता आहे.” विक्रीची सोय नसल्यामुळे वखारीत ठेवलेला कांदा हळूहळू खराब होतो आहे.
- राजहंस भापकर, शेतकरी, कारखेल

03080

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.