शिवभोजन चालकांची दिवाळी गोड
आठ महिन्यांपासून थकलेले अनुदान मंजूर
नवीन पनवेल, ता. १८ (बातमीदार) ः गरजूंना केवळ दहा रुपयांत जेवण देणाऱ्या शिवभोजन केंद्राच्या संचालकांचे आठ महिन्यांचे अनुदान थकले होते. अखेर शुक्रवारी थकीत अनुदान बँक खात्यात जमा झाल्याने शिवभोजन चालकांची दिवाळी गोड झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन केंद्राची योजना सुरू झाली होती. या योजनेंतर्गत गरजूंना दहा रुपयांत भोजन देण्याची तरतूद आहे. पनवेल तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागांत १९ शिवभोजन केंद्रे आहेत. शहरी भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर ४० रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून दहा रुपये, तर ग्रामीण भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर २५ रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून दहा रुपये मिळतात. एप्रिल २०२५ पासून ऑक्टोबरपर्यंतचे तब्बल आठ महिन्यांचे अनुदान थकीत होते. परिणामी, केंद्र संचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पनवेल येथील शिवभोजनचे केंद्रचालक नितीन तांबोळी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिवाळीत शिवभोजन चालकांची दिवाळी गोड झाली आहे.
--------------------------
शिवभोजन केंद्रे
शहरी - ११
ग्रामीण - ८
एकूण केंद्रे - १९
बंद केलेली केंद्रे - ५
------------------------
शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर जिल्हा ट्रेझरी कार्यालयाने त्यांची प्रक्रिया वेळेवर पूर्ण केल्यास, योजना आणखी प्रभावीपणे राबविणे केंद्र चालकांस शक्य होईल. योजनेसाठी तालुका पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
- नितीन तांबोळी, शिवभोजन केंद्रचालक, पनवेल
------------------------
शिवभोजन ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तहसील कार्यालयात देयके जमा केल्यानंतर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे पाठविली जातात. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर, ट्रेझरीमार्फत अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून अनुदान चालकांच्या खात्यावर जमा केले जाते.
- सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड