वेल्हे, ता.१८ : पानशेत धरण खोऱ्यातील शिरकोली (ता.राजगड) येथे विहिरीत पाणी भरताना पडून रमाबाई धोंडिबा मरगळे (वय ५९,रा. शिरकोली) हिचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.१६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी मृत महिलेचे पति धोंडिंबा रामभाऊ मरगळे ( वय ७५, रा .डांगेखिंड शिरकोली) यांनी वेल्हे पोलिसांना खबर दिली आहे. त्यानुसार वेल्हे पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे पती धोंडिबा हे गुरुवारी दुपारी तीन वाजता शेतातून घरी आले. मात्र, त्यांना घरात पत्नी रमाबाई दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी ते विहिरीवर गेले. त्यावेळी विहिरीतील पाण्यावर पत्नी रमाबाई या तरंगताना दिसल्या. तसेच पाण्याचा हांडाही पाण्यावर तरंगत होता. या घटनेबाबत त्यांनी नातेवाइक, ग्रामस्थांना व पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर वेल्हे पोलिस यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य तानाजी भोसले यांच्या सहकाऱ्यांनी व ठाण्याचे पोलिस हवालदार पकंज मोघे यांच्यासह पोलिस जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने रमाबाई यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे बुद्रुक येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या देखरेखीखाली पोलिस हवालदार पंकज मोघे तपास करत आहेत.