IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या भवितव्याची नवी पहाट; वन डे मालिका स्वतःला सिद्ध करणारी
esakal October 20, 2025 06:45 AM

पर्थ, ता. १८ (पीटीआय) : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताची एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरू होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या महान खेळाडूंचे भवितव्य ठरवणारी ही मालिका असणार आहे. त्याच वेळी शुभमन गिल आता व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये कसे नेतृत्व करतो, याकडेही लक्ष असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. यातील रोहित शर्मा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला तेव्हा तो कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात निर्णायक अर्धशतकी खेळी करून त्याने देशाला चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला आहे. आता कर्णधारपदावरून दूर केल्यामुळे तो केवळ खेळाडू म्हणून उद्या मैदानात उतरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत बरेच काही बोलले गेले. दोन वर्षांनी होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी या दोघांना संघात स्थान असेल की नाही, हेसुद्धा निश्चित नाही. येथून पुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यातून रोहित-विराट यांची परीक्षा होणार नाही; पण त्यांचे मूल्यमापन होईल, असे विधान कालच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केलेले असल्यामुळे या दोन महान फलंदाजांना पुन्हा एकदा स्वताला सिद्ध करावे लागणार आहे.

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

आपल्या भवितव्याची जाणीव रोहित आणि विराट या दोघांनाही झालेली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून या दोघांनी सरावात मोठ्या प्रमाणात घाम गाळला आहे. एकूणच परिस्थिती पाहता हे दोघेही अनुभवी फलंदाज अधिक स्फोटक ठरू शकतात आणि अर्थातच त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकेल. रो (हित) को (हली) यांना 'रो-को' म्हणून संबोधले जात आहे. तंदुरुस्त नसल्यामुळे पॅट कमिंस ऑस्ट्रेलिया संघात नाही; परंतु मिचेल मार्श आणि जॉश हॅझलवूड यांच्यासमोर 'रो-को' यांना रोखण्याचे आव्हान असेल.

संघ शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल.

ऑस्ट्रेलियाः मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हियस ब्रेटलेट, कूपर कॉनोली, बेन द्वारशूईस, नॅथन इलिस, जॉश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहेनमन, मार्नस लाबूशेन, मिचेल ओवेन, जॉश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट आणि मिचेल स्टार्क.

Shubman Gill: 'माझ्या जागेवर ते कर्णधार असते, तर त्यांनी...', विराट - रोहितसोबतच्या संबंधांवर कॅप्टन गिल अखेर स्पष्ट बोलला

रोहित, विराटबरोबरचे नाते पूर्वीइतकेच घट्ट रोहितकडील कर्णधारपद आपल्याकडे देण्यात आले आणि समाज माध्यमांवर याचे पडसाद उमटून नरेटिव्ह सुरू झालेले असले तरी रोहित आणि विराट यांच्याबरोबर असलेले आपले नाते पूर्वी होते तितकेच घट्ट आहे, असे मत शुभमन गिल याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गिलने रोहित आणि विराटसह असलेल्या घट्ट नात्याचा निर्वाळा दिला. रोहित हा नेहमीच सहाय्य करण्यास आघाडीवर असतो आणि त्यामुळे मी त्याच्याकडे कोणतीही मदत मागू शकतो, असे गिलने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.