Womens World Cup : इंग्लंडचं भारतासमोर 289 धावांचं बलाढ्य आव्हान, कोण मारणार बाजी?
Tv9 Marathi October 20, 2025 07:45 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात महत्त्वाचा सामना होत आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. तर भारताने हा सामना गमावला तर उपांत्य फेरीचं गणित खूपच किचकट होईल. यामुळे या सामन्यात टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मनासारखा होता. कारण नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी स्वीकारली असती असं तिने सांगितलं. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या मनासारखं झालं आहे. इंग्लंडने 50 षटकात 8 गडी गमवून 288  धावा केल्या आणि विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं आहे.

या सामन्यात इंग्लंडने सावध पण आश्वासक खेळी केली. पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. टॅमी ब्यूमोंटची विकेट मिळाली आणि टीम इंडियाला पहिलं यश मिळालं. त्यानंतर एमी जोन्स ही 56 धावा करून तंबूत परतली. या दोन विकेट पडल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी टीम इंडियाला 211 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. हीथर नाईटने या सामन्यात 91 चेंडू खेळत 15 चौकार आणि 1 षटकार मारत 109 धावा केल्या. कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट 38 धावांवर बाद झाली. शेवटच्या टप्प्यात विकेट मिळत गेल्या आणि धावगती कमी झाली.

भारताकडून दीप्ती शर्माने सर्वोत्तम गोलंदाजी केली. तिने 10 षटकात 51 धावा देत 4 गडी बाद केले. तर श्री चरणीने 10 षटकात 66 धावा देत 2 गडी बाद केले. तर दोन विकेट धावचीत झाल्या. त्यामुळे दोन गोलंदाज वगळता इतर गोलंदाज पूर्णपणे फेल गेले. रेणुका सिंह ठाकुर, क्रांती गौड, स्नेह राना आणि अमनज्योत कौर यांना एकही विकेट मिळाली नाही. आता भारतीय संघ इंग्लंडने दिलेलं आव्हान पेलणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे. अन्यथा उपांत्य फेरीचं गणित खूपच किचकट होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.