कैनाडमध्ये एकाचवेळी चार अजगरांचा थरार
esakal October 20, 2025 10:45 AM

कासा, ता. १९ (बातमीदार) ः डहाणू तालुक्याच्या कैनाड गावातील पाटीलपाडा येथे चिकूच्या वाडीत एकाचवेळी चार अजगर आढळल्याने ग्रामस्थ आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले; मात्र वनविभाग आणि प्राणिमित्रांच्या तत्परतेमुळे या अजगरांना सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

कैनाड हे आदिवासीबहुल गाव असून या परिसरात घनदाट झाडी, डोंगराळ प्रदेश आणि चिकू बागायती आहेत. त्यामुळे येथे विविध प्रकारचे वन्यजीव आणि सापांचे वास्तव्य आढळते. शुक्रवारी (ता. १७) सकाळी पाटीलपाडा येथील अस्पी दिनशा रुस्तम यांच्या चिकूवाडीत मजुरांना मोठ्या आकाराचे चार अजगर दिसले. इतके मोठे साप एकाच वेळी पाहून मजुरांनी काम थांबवले आणि भीतीने वाडीबाहेर धाव घेतली. घटनास्थळी वाडी व्यवस्थापक हितेन तांडेल यांनी वनविभागाला संपर्क साधला. डहाणू वनविभागाचे कर्मचारी, तसेच पालघरचे मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी, वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य एरिक ताडवाला, प्रतीक वाहूरवाघ, रेमंड डिसोझा, भावेश बाबरे, अविनाश महाडिक यांनी घटनास्थळी दाखल झाले.

प्राणिमित्रांच्या मते, एकाच वेळी चार अजगर आढळण्याची ही पालघर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. चारही अजगरांना काळजीपूर्वक पकडून तपासणी केल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.