डोळखांबला परतीच्या पावसाचा तडाखा
कापलेली भाताची रोपे पाण्यावर तरंगली
किन्हवली, ता. १९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात शनिवारी (ता. १८) सायंकाळी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी कापलेली भातपिके पाण्यावर तरंगू लागली, तर सोसाट्याच्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याने काही भागांतील रस्ते बंद झाले होते. तोंडाशी आलेल्या भातपिकाची डोळ्यादेखत झालेली दुरवस्था पाहून शेतकऱ्यांवर डोके धरण्याची वेळ आली आहे.
खराडे, चांग्याचापाडा, चिखलीगाव आणि साकुर्ली आदी परिसरात दुपारनंतर झालेल्या या पावसाने शेतात साठलेल्या पाण्यामुळे कापलेली भातपिके तरंगू लागली. पाण्यात भिजल्याने पेंढाही (वैरण) काळा पडणार असल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण होणार आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ थांबली होती.
शेतकरी भात कापल्यानंतर ते खळ्यात आणून झोडणे, सुकवणे आणि व्यापाऱ्याला विक्री करून आलेल्या पैशांतून कुटुंबाच्या गरजा (कपडे, जिन्नस-सामान आणि फटाके) पूर्ण करण्याचे नियोजन करतात; मात्र यावर्षी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ‘नको नको रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शेतात साठलेल्या पाण्यामुळे पिकांची रोपे आडवी झाली असून, भाताच्या दाण्याच्या लोंब्या गळून पडत आहेत. गेली ४० वर्षांत पहिल्यांदाच असा पाऊस पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. भातकापणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याला पिकाचे विदारक दृश्य बघून डोके धरण्याची वेळ आली आहे. चौफेर नुकसानीच्या खाईत सापडलेल्या या शेतकऱ्यांनी आता पीक विम्याच्या मदतीची आस धरली आहे.
किन्हवली : भातपिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांवर डोके धरण्याची वेळ आली आहे.