मोकाट गोवंशांच्या सुरक्षेसाठी 'रेडियम बेल्ट' उपक्रम
esakal October 20, 2025 04:45 PM

rat19p9.jpg-
99516
रत्नागिरीः शहरातील मोकाट जनावरांना रेडियम बेल्ट बांधताना योगेश हळदवणेकर आणि पथक.

मोकाट गोवंशांच्या सुरक्षेसाठी रेडियम बेल्ट उपक्रम
हळदवणेकर यांचा स्तुत्य उपक्रम; रस्ते अपघात टळणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : रत्नागिरी शहरात रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गोमाता व गोवंशांच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. रात्री अपघातग्रस्त होणाऱ्या मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी गोवंशांना ‘रेडियम बेल्ट’ घालण्यात येत आहे.
हळदवणेकर यांनी राबवलेल्या गोवंशाच्या सुरक्षेसाठीच्या उपक्रमात शशिकांत गुरव आणि अजिंक्य केसरकर यांनी त्यांना सक्रिय मदत केली असून, ग्रामीण पोलीस ठाणे, रत्नागिरी यांच्या सहकार्यामुळे हे रेडियम बेल्ट उपलब्ध झाले. त्यामुळे हळदवणेकर यांनी पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.
शहरातील मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या भागांमध्ये अनेक गोवंश मोकाट फिरत असतात. रात्रीच्या अंधारात ही जनावरे वेळेवर न दिसल्याने अनेकदा वाहनधारकांचे नियंत्रण सुटते आणि गंभीर अपघात होतात. यामध्ये गोवंशांचा मृत्यू होतो किंवा त्यांना गंभीर दुखापत होते. ही बाब लक्षात घेऊन हळदवणेकर यांनी गोवंशांच्या गळ्यात चकाकणारे रेडियम बेल्ट बांधण्याची मोहीम राबवली आहे. या बेल्टमुळे वाहनचालकांना रस्त्यावर उभे असलेले गोवंश दूरवरूनच दिसतात, त्यामुळे ते वेळीच गाडीचा वेग कमी करून संभाव्य अपघात टाळू शकतात. हळदवणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक गोमाता व गोवंशांना हे सुरक्षा बेल्ट लावले असून, त्यांच्या या कार्याचे प्राणीप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
योगेश हळदवणेकर यांचे हे कार्य केवळ प्राणीप्रेमाचे प्रतीक नसून, सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे. प्रशासनाने किंवा नागरिकांनीही अशा प्रकारे आपल्या परिसरातील मोकाट जनावरांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतल्यास, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. रत्नागिरीत गोसंरक्षणासाठी कृतीशील आणि जागरूक असा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या योगेश हळदवणेकर यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.