द्राक्ष बागांना पावसाचा फटका
esakal October 20, 2025 01:45 PM

महाळुंगे पडवळ, ता. १९ : आंबेगाव तालुक्यात मे महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला आहे. घड निर्मिती न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सहदेव रामटेके यांच्या पथकाने पाहणी केली. त्यानंतर आंबेगाव तालुका कृषी विभागाने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
आंबेगावमधील कळंब, घोडेगाव, चांडोली बुद्रूक, लौकी, कळंबई या भागात द्राक्ष पीक घेणारे शेतकरी आहेत. कळंब येथे सर्वाधिक द्राक्ष बागा आहेत. खरड छाटणी ते माल काढणी पर्यत खते, औषधे, मजुरी असा एकूण सरासरी तीन ते चार लाख रुपयांपर्यंत वार्षिक खर्च करावा लागतो. या वर्षी मे महिन्यात झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभावामुळे बहुतांश द्राक्ष बागांना घड निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली होती.
कळंब (ता. आंबेगाव) येथील शेतकरी नीलेश रंगनाथ कानडे यांच्या द्राक्ष बागेची पाहणी करताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रामटेके, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, उपकृषी अधिकारी नमिता राशीनकर, सहाय्यक कृषी अधिकारी दीपाली धिमते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, कमलजादेवी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष दिलीप वऱ्हाडी, राजाभाऊ कानडे, अनिल कानडे, महेंद्रनाथ कानडे, तुषार थोरात, नवनाथ कानडे, महेश कानडे, एकनाथ कानडे उपस्थित होते.

03407

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.