महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच ः रवींद्र चव्हाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : भाजपच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढवाव्यात, असा सूर आवळला आहे. यामुळे शिंदे सेना व भाजप यांच्यातील संघर्षदेखील अधिक तीव्र होताना दिसत आहे. अशातच निवडणुकांबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे वरिष्ठ नेते घेतील. त्यामुळे सर्वांनी सबुरी बाळगावी, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला. महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात शुक्रवारी (ता. १७) भाजपच्या पक्ष कार्यालयात कोकण विभागीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अलीकडच्या काळात शिंदे सेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह वनमंत्री गणेश नाईक यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत स्वबळावर लढण्याचे मत व्यक्त केले होते. तर नाईक यांनीही शिंदे सेनेविरोधात टीकास्त्र सोडत आपल्या कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी ठेवण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांना संयम पाळण्याचा आणि महायुतीच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. महापालिका निवडणुकांना अजून दोन महिने आहेत. सध्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू करावी, आरक्षणाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी आणि उमेदवार चाचपणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी आवश्यक तयारी केली पाहिजे. या तयारीचा फायदा महायुतीलाच होतो. त्यामुळे स्वबळाच्या चर्चांपेक्षा युतीच्या तयारीकडे लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.
योग्य वेळी बोलेन : नाईक
दरम्यान, या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला असता, सांगण्यासारखे बरेच आहे, पण सध्या नाही. योग्य वेळी बोलेन, एवढेच म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.