गांधारे पुलावर गुटखा पुरवठादाराला अटक
टेम्पोसह ८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
डोंबिवली, ता. १९ ः कल्याण गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारे पुलावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गुजरातमधून तस्करीने आणलेला तब्बल ८७ लाख ३७ हजार ४७२ रुपये किमतीचा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य साठा टेम्पोसह जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राजस्थान राज्यातील रहिवासी असलेल्या धनराज रामगोपाल स्वामी (वय ४१) याला अटक केली आहे. टेम्पोमधून धनराज हा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य वस्तू घेऊन गुजरातमधून कल्याणकडे येत होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांना गुजरात राज्यातून गुटखा घेऊन एक टेम्पो कल्याण शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक विनोद पाटील, किरण भिसे यांच्यासह पोलिस पथकाने गांधारे पुलाजवळ सापळा रचला. शुक्रवारी (ता. १७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. टेम्पोची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
ड्रायव्हर धनराज स्वामी याची चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तस्कर साथीदारांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धनराज याच्यासह अन्य साथीदारांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.