प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईसाठी अभिनव उपक्रम
नेरूळ, ता. १९ (बातमीदार) ः शाश्वत शहरी जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहकार्याने नवी मुंबई प्लॅस्टिक अँड वेस्ट रिसायक्लोथन हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅस्टिक आणि ई-वेस्टला आळा घालणे आणि चक्राकार प्रक्रिया पद्धतींना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आणि माईंड स्पेस आरइआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांच्या झालेल्या बैठकीत उपक्रमाच्या अंमलबजावणीविषयी चर्चा झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. या वेळी प्लॅस्टिक बॉटल्सपासून बनविलेल्या आकर्षक टी-शर्टचे अनावरणही झाले.
क्षेपणभूमीवर शून्य कचरा नेणे हा अजेंडा
- रिसायक्लोथोन उपक्रमाचे उद्दिष्ट वर्तनात्मक बदल घडवून आणणे आणि दैनंदिन जीवनात घनकचरा व्यवस्थापनाबद्दल आस्था निर्माण करणे हे आहे. याअंतर्गत २०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबवून दोन लाखांहून अधिक नागरिकांना सामावून घेण्यात येणार आहे.
- विविध गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट्स, शाळा आणि सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने क्षेपणभूमीवर शून्य कचरा नेणे हे ध्येय या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य करावयाचे आहे.
- या उपक्रमांतर्गत गोळा केलेले प्लॅस्टिक आणि ई-कचरा याद्वारे बेंचेस, प्लांटर्स, वॉकिंग ट्रॅक आणि शालेय साहित्य यासारख्या वस्तू व साहित्य बनविण्यात येणार असून, प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे.