मार्केट यार्ड, ता. १९ : पुणे मार्केट यार्डातील भुसार विभागात दिवाळीच्या महिनाभरात तब्बल ३०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. या वाढत्या व्यापाराने बाजार समिती तसेच व्यापारी वर्गाला आर्थिक बूस्टरचा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी अंदाजे २५० कोटींच्या उलाढाल झाली होती. तुलनेत यंदा तब्बल ५० कोटी रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती आहे.
नागरिकांकडून यंदा दिवाळी खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन खरेदीऐवजी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीला प्राधान्य देण्यासाठी व्यापारी संघटनांनी प्रचार मोहिमा राबविल्या. परिणामी, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगर भागातील ग्राहकांनी मार्केट यार्डाकडे मोर्चा वळवला होता. मागणी वाढल्यामुळे धान्य, कडधान्य, तेलबिया, सुकामेवा व मसाले यांच्या आवकेतही वाढ झाली.
दिवाळी फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे आटा, रवा, बेसन, मैदा, पोहे, तूप, तेल आणि साखर यांना मोठी मागणी होती. याशिवाय ड्रायफ्रुटला गिफ्ट आयटेम म्हणून ग्राहकांकडून पसंती मिळाली. मिठाईच्या वाढत्या दरांच्या तुलनेत सुकामेवा स्वस्त असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुटची खरेदी केली. व्यापारी आणि बाजार समितीच्या दृष्टीने दिवाळी ‘बूस्टर’ ठरली आहे. भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, या वर्षीची उलाढाल केवळ विक्रमी नाही तर स्थैर्य आणि विश्वासाचं प्रतीक ठरली आहे. बाजार समितीच्या प्रशासनाच्या माहितीनुसार, दिवाळी कालावधीत सुमारे ३०० कोटी रुपयांहून अधिक माल विक्री आणि खरेदी व्यवहार झाले. संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर अजून उलाढाल वाढेल.
दिवाळीतील स्थानिक खरेदीचा उत्साह म्हणजेच बाजारपेठेच्या नव्या ऊर्जेचा प्रारंभ ठरला. आटा, बेसन, मसाले आणि ड्रायफ्रुटच्या वाढत्या विक्रीमुळे व्यापारी वर्गात आत्मविश्वास परतला आहे. मार्केट यार्डातील व्यवहारांना नवे बळ मिळाले आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात भर टाकणारा हा उत्साह खऱ्या अर्थाने आनंददायी ठरला.
- राजेश शहा, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड
मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ग्राहकांची गर्दी लक्षणीय वाढली. परिणामी, मालाची विक्री अधिक झाली आणि मागील वर्षीच्या तुलनेत उलाढाल वाढली आहे. नागरिकांच्या उत्साहाचा परिणाम थेट भुसार बाजारात दिसून आला आहे.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
फराळासाठी लागणाऱ्या धान्य, मसाले, तेल व तुपाबरोबरच गिफ्ट म्हणून ड्रायफ्रुटची खरेदी अधिक झाली. ऑनलाइन खरेदीऐवजी स्थानिक बाजारातील वस्तूंना ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर