रायगडमध्ये दिवाळीनिमित्त अनोख्या परंपरा
esakal October 20, 2025 06:45 PM

रायगडमध्ये दिवाळीनिमित्त अनोख्या परंपरा
शिवकालीन ठेवा, पारंपरिक कोकणी प्रथा यांचा अद्भुत संगम
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी, जिथे दिवाळी फक्त दिव्यांचा उत्सव नसून ऐतिहासिक वारसा, कोकणी संस्कृती आणि शेतीतल्या कष्टाचे फळ यांचा मिलाफ दिसून येतो. जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक वैविध्यामुळे रायगडमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत शिवकालीन ठेवा आणि पारंपरिक कोकणी प्रथा एकत्रित दिसतात.
कोकण किनारपट्टीवर वसलेल्या रायगड जिल्ह्यातील संस्कृती कृषी आणि समुद्रकिनारी जीवनावर आधारित आहे. रायगड किल्ल्यावर साजरा होणारा दीपोत्सव याचे मुख्य आकर्षण मानला जातो. स्वराज्याची राजधानी असल्यामुळे या किल्ल्यावर दिवाळी अत्यंत उत्साहाने आणि शिवकालीन परंपरेनुसार साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पारंपरिक वेशभूषा केलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढली जाते, जिथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही दाखवली जातात. शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमून जातो. यामुळे दीपोत्सवाला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूप मिळते.
रायगड जिल्ह्यातील दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव नसून, शौर्य, त्याग आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो. कर्जत तालुक्यातील सिद्धगडावर दरवर्षी दिवाळीत एक स्फूर्तिदायक दीपोत्सव साजरा केला जातो. स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्या स्मृतीसाठी शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीपूर्वी रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्या आणि समई विक्रीसाठी येतात. यामुळे बाजारपेठा उत्सवात अधिकच सजतात.
.........
दिवाळीत किल्ले बांधण्याची प्रथा

रायगडसह संपूर्ण कोकणात लहान मुलांकडून मातीचे किल्ले बांधण्याची प्रथा आहे. मुले घरातील अंगणात किंवा मोकळ्या जागेत रायगड, प्रतापगड, जंजिरा यांसारख्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतात. यामागचा उद्देश लहान वयातच गडकिल्ल्यांचा इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि महाराजांचा वारसा जपण्याची प्रेरणा देणे हा आहे.
.......................
बलिप्रतिपदेची आगळी प्रथा

रायगडमधील काही भागांत बलिप्रतिपदेच्या दिवशी घरातील कचरा, राखाडी, फराळ, नाणे एकत्र करून पणती पेटवली जाते. हे भांडे घराबाहेर नेऊन फटाके वाजवून कचरा जाळला जातो. काही ठिकाणी प्रतीकात्मक शेणाचा गोठा तयार करून ‘कारटा’ नावाची झाडाची फांदी टोचून कृष्णाचे रूपक साकारले जाते. ही प्रथा घरातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानली जाते.
.............
दिवाळी खाद्यसंस्कृती
रायगडच्या दिवाळीत पारंपरिक कोकणी पदार्थ आणि तांदळाचे फळ यांचा ठसा दिसतो. नरकचतुर्दशीला पोहे खाण्याची खास प्रथा आहे. यामुळे घरात खमंग पोहे, गूळ पोहे, दूध पोहे आणि बटाटा पोहे बनवले जातात. पारंपरिक फराळाचे महत्त्वदेखील जपले जाते. रवा लाडू, बेसन लाडू, करंजी, शंकरपाळी आणि अनारसे घराघरात तयार होतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी साळीच्या लाह्या आणि बताशांचा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटला जातो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.