भारतीय शेअर बाजारात बीएसईवर 1957 पासून दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगचं आयोजन केलं जातं. तर एनएसईवर 1992 पासून मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र आयोजित करण्यात येतं. उद्या हे एका तासाचं विशेष सत्र दुपारी पावणे दोन ते पावणे तीन या कालावधीत असणार आहे.
जिओजित इन्वेस्टमेंटस मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं शेअर बाजारात चांगली कामगिरी करणाऱ्या 12 स्टॉकची निवड केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ते अल्ट्राटेक सिमेंट यासह विविध स्टॉकचा समावेश आहे.
जिओजित इन्वेस्टमेंटसनं निवडलेल्या 12 स्टॉक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, हिंदुस्तान यूनिलिव्हर, मारुती सुझूकी, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्यूमर प्रोडक्टस, हिरो मोटोकॉर्प सुझलॉन एनर्जी, ब्रिगेड एंटरप्रायझेस, कॅन फिन होम्स आणि एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंगचा समावेश आहे.
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टॉक बँकिंगमधील टॉप शेअर म्हणून जिओजित इन्वेस्टमेंटसनं निवड केली. स्टेट बँकेच्या शेअरमध्ये आज 18 रुपयांची वाढ होऊन तो 907 रुपयांवर पोहोचला आहे.
इन्फोसिसची निवड लार्ज कॅप आयटी स्टॉक म्हणून जिओजित इन्वेस्टमेंटसनं केली आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये आज 19 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. इन्फोसिसचा शेअर सध्या 1460.90 रुपयांवर आहे. तर, फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स या सेक्टरमधील हिंदुस्तान युनिलीवरला देखील पसंती देण्यात आली आहे.
जीएसटीचे दर कमी केल्याचा वाहन उद्योगावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. जीएसटी दरकपातीमुळं वाहनांची मागणी वाढलीय. मारुती सुझुकी चा स्टॉक देखील जिओजितनं निवडला आहे. भारतीय बाजारपेठेवर या कंपनीचं चांगलं वर्चस्व आहे. खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एक्सिस बँकेच्या स्टॉकला देखील जिओजित इन्वेस्टमेंटसनं पसंती दर्शवली आहे.
याशिवाय सिमेंट उद्योगातील नामांकित कंपनी अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्युमर प्रोडक्टस, हिरो मोटोकॉर्प,सुझलॉन एनर्जी, ब्रिगेड एंटरप्रायझेस,कॅन फिन होम्स,एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग या स्टॉकला देखील जिओजित इन्वेस्टमेंटसनं पसंती दर्शवली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 20 ऑक्टोबर 2025 08:25 PM (IST)