Nitesh Rane : 'राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात', नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
Tv9 Marathi October 21, 2025 02:45 AM

राणे कुटुंबिय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. पण अलीकडे नितेश राणे हे राज ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका करताना दिसले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “राज ठाकरे यांची काल सभा झाली. ते अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात. अशा सभा आणि वोट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत?” असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. “कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत. वाढवणच्या एका बंदरामुळे 12 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. 12 लाख थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहेत. कुठल्या हिशोबाने वाढवण वाईट आहे?” असा सवाल नितेश राणे यांनी केला.

“हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहेत? चुकीची माहिती राज ठाकरेंना दिलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे मोठे नेते होते. ते 1950 ला वारले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1956 ला झाली. चांगल्या प्रकल्पाला विरोध कुणीच करू नये.
अदानींचे मातोश्रीवरचे फोटो आहेत. आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे. तुम्ही मालेगाव, बहरमपाडा,नळ बाजारमध्ये कधी जाणार?” अस सवाल नितेश राणे यांनी विचारला.

संजय राऊत यांची अर्बन नक्षलची भाषा

“अबू आझमींच्या कानाखाली का खेचली नाही?. मानखुर्द शिवाजी नगरमध्ये बांग्लादेशी आणि रोहिंगे यांना बाहेर काढण्याचे काम आमच्या सरकारने केलेलं आहे. मविआच्या नादाला लागून टार्गेट केलं जातं आहे” असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांच्यानुसार, संजय राऊत हे अर्बन नक्षलची भाषा करत आहेत.

‘मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्यात’

“राज साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये ते वाया गेलेले मतदार आहेत. उद्या हाजीअलीला जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का? वातावरण कोण खराब करतय? नमाज पढण्यासाठी यांना मशिदी कमी पडत आहेत. मोर्चे मोहल्यावर काढा आधी” अशी टीका नितेश राणे यांनी केली. राज ठाकरे यांनी मतदार यादीतीला घोळाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यावर राज ठाकरेंनी सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्यात असं नितेश राणे म्हणाले.

‘उबाठाकडे उमेदवार नाहीयत’

महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढतीबद्दल नितेश राणे म्हणाले की, “मैत्रीपूर्ण लढत असेल तर त्याचा फायदा महायुतीला होईल.
वेगवेगळं लढायचं आणि नंतर युती करायची. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाकडे उमेदवार नाहीयत”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.