निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत, ज्या चोराला रंगेहाथ…; संजय राऊतांचा टोला
Tv9 Marathi October 21, 2025 02:45 AM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मतदार यादीतील कथित घोटाळ्यावरून आज भाजप आणि शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या मतदार यादीत एक कोटी बोगस मतदार आहेत. अमित शहांनी घुसखोरांना शोधण्याची सुरुवात या बोगस मतदारांपासून करावी,” असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. या मतदार यादी घोटाळ्याविरोधात १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याबद्दलही त्यांनी भाष्य केले.

चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढवले हा काय प्रकार आहे? कुठून येतात हे? अमित शाह बोलतात, आम्ही घुसखोरांना शोधून काढू. घुसखोर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हाकलून देऊ. महाराष्ट्रात एक कोटी बोगस मतदार आहेत. अमित शहांनी हे एक कोटी घुसखोर, जे तुमच्या भाजप-शिंदे लोकांनी घुसवलेत, सुरुवात तिथून करा. मतदार यादीत घोटाळा असल्यामुळे निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत. यामुळे देशाचे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असे संजय राऊत म्हणाले.

चोरच पुरावा मागतोय

निवडणूक आयोगाने कारवाई करावी यासाठी १४-१५ तारखेला शिष्टमंडळ भेटले आणि पुरावेही दिले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान ४६ लाख मतदार वाढले ते मतदान एकाच पक्षाला कसे जाऊ शकते? दुसरे निवडणुकीला उभे नव्हते का? कसले पुरावे मागता? चोर पुरावे मागतो. मी चोरी केलीय? ज्या चोराला रंगेहाथ पकडले आहे, तो चोरच पुरावा मागतोय. हा चोर आहे.” असा घणाघात संजय राऊतांनी केला.

खाई त्याला खवखवे ही मराठीत म्हण आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सवाल विचारतोय, उत्तर भाजपचे नेते देतात.  निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असेल तर आमच्या शंकांचे निरसन आयोगाने करावे. भाजप उत्तर देत असेल तर याची मिलीभगत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला. यावेळी संजय राऊतांनी भाऊबंदकी नाटकाचा संदर्भ दिला. एकनाथ शिंदे यांचे वाचन वाढले असल्याचे दिसत आहे, मराठी वाचता येत आहे. त्यांना माझा प्रश्न विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण? हे नाटक कोणत्या साली आले? हे नाटक आपण पाहिले काय? प्रभाकर खाडिलकर हे या नाटकाचे लेखक आहेत. भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार नाही. मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी नरकचतुर्दशीचा उल्लेख करत शिंदे गटावर नरकासुर अशी टीका केली. आज नरकचतुर्दशी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. हे नरकासुर इथे आहेत आणि गुवाहाटीला जाऊन पूजा करतात. आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे, त्यांना गुवाहाटीला जावे लागेल कदाचित. पण त्या नरकासुराचा अंत झाला. या गद्दारांना जनता नरकासुराप्रमाणे पायाखाली चिरडले. ” असे भाष्य राऊत यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.