योजनांसाठीची लॉटरी पद्धत बंद
कृषी विभाग ; बनावट कागदपत्रामुळे फार्मर आयडी होणार ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः फार्मर आयडी (अग्रीस्ट्रॅक) काढण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्र सादर करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी पुढील पाच वर्षाकरिता ब्लॉक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
महाडीबीटीच्या योजनांसाठी चुकीची माहिती, खोटी कागदपत्र देण्याऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या घटकाकरिता लाभार्थ्यांची निवड होईल, त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने घेणे अपेक्षित आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत लाभ न घेतल्यास अनुदानित घटकांचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान परत करावे लागणार असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांची ओळख पटवून देणारे एक युनिक डिजिटल ओळख क्रमांक असून शेतकऱ्यांची एकत्रित माहिती असते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र, फार्मर आयडी काढणे आहे. कृषी अनुदान, पीक विमा, खते, बियाण्यावरील सवलत व कर्जमाफीसाठी महत्वपूर्ण फार्मर आयडी आहे. महाडीबीटीवरील योजनासाठी जे शेतकरी अर्ज करताना चुकीची, खोटी माहिती सादर करतील त्यांचा अनुदानावरचा लाभ वसूल केला जाणार आहे. अलीकडे महाडीबीटीवरिल विविध योजनांसाठी आता लॉटरी पद्धत बंद केली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
चौकट
तालुकानिहाय फार्मर आयडी
तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असे ः मंडणगड १२,८०२, दापोली २५,४७७, खेड २४,२२३, चिपळूण ३८,३५१, गुहागर २९,०४६, संगमेश्वर २८, ३२७, रत्नागिरी २३, २७०, लांजा २१, ७६४, राजापूर २१, ४६३ असे आहेत.