टीम इंडियाने 28 सप्टेंबरला पाकिस्तानचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा उडवत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकली होती. मात्र एसीसी अध्यक्ष असलेल्या पाकिस्तानी मोहसीन नक्वी याने टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी दिली नाही. आता अंतिम सामना होऊन जवळपास महिना होत आलाय. त्यानंतरही एसीसीने ट्रॉफी न दिल्याने बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीसीसीआयने नक्वीला पत्र लिहत इशारा धमकीवजा इशारा दिला आहे. ट्रॉफी न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशाराच बीसीसीआयने नक्वीला दिला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या इशाऱ्यानंतर नक्वी ट्रॉफी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मोहसिन नक्वीने आता आशिया कप 2025 ट्रॉफी देण्याबाबत सकारात्मक उत्तर दिलं नाही तर बीसीसीआय टप्प्या-टप्प्याने नियमांद्वारे कारवाई करेल, असं बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना म्हटलं.
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला होता. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 2 बॉलआधी पूर्ण केलं होतं. भारताने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 150 धावा केल्या होत्या. तिलक वर्मा याने धावांचा पाठलाग करताना भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. तिलकने नाबाद 69 धावांची खेळी केली होती. टीम इंडियाची या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली होती. टीम इंडियाने पाकिस्तानला याआधी साखळी आणि सुपर 4 फेरीत पराभूत केलं होतं.
फायनलनंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात होते. भारतीय खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरिज आणि इतर पुरस्कार स्वीकारले. मात्र टीम इंडियाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी असलेल्या एसीसी अध्यक्षाच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र एसीसीला दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हस्ते टीम इंडियाला ही ट्रॉफी देता आली असती. मात्र नक्वीने तसं न करता स्वत: जवळ ट्रॉफी ठेवली. नक्वी ट्रॉफी मैदानातून घेऊन निघून गेले. तेव्हापासून ट्रॉफीवरुन वाद सुरु आहे. तसेच नक्वीने ट्रॉफी न दिल्याने त्याला ‘ट्रॉफी चोर नक्वी’ असंही नेटकरी म्हणत आहेत.
दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला 14 सप्टेंबरला साखळी फेरीत 7 विकेट्सने लोळवलं होतं. तसेच 21 सप्टेंबरला सुपर 4 मध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला होता.