देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. प्रत्येक घरात सणाची तयारी सुरू असताना गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने मात्र एक भावनिक खुलासा केला आहे. ‘टीम दिलजीत ग्लोबल’ या त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिलजीतने आपल्या बालपणाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. बालपणी तो कुटुंबापासून वेगळा झाला आणि दिवाळीचा सगळं आनंदच हिरावला गेला असं त्याने सांगितलंय.
या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण होता. मी लहानपणी खूप फटाके फोडायचो. आमचं घर आणि गाव रोषणाईने उजळून निघायचं. गुरुद्वारा, शिव मंदिर, दर्गा, गुगा पीर मंदिर सगळीकडे दिवे लावायचो, पण जेव्हा मी माझ्या कुटुंबापासून दूर गेलो, तेव्हापासून मी हा सण साजरा करणं बंद केलं. आता मी दिवाळी साजरी करत नाही.” तो पुढे म्हणाला, “आधी आम्ही महिनाभर आधीपासून तयारी सुरू करायचो, पण आता फटाक्यांचा आवाज ऐकला तरी भीती वाटते. जेव्हा कुटुंबापासून वेगळं झालो, तेव्हा दिवाळीची ती चमक आणि आनंद नाहीसा झाला.”
दिलजीतने यापूर्वीही एका मुलाखतीत आपल्या पालकांशी असलेल्या दुराव्याबद्दल बोलताना सांगितले होते की, लहानपणी त्याला चांगलं शिक्षण आणि जेवण मिळावं म्हणून नातेवाइकांकडे लुधियानाला पाठवलं गेलं, मात्र त्या काळात त्याचं आणि पालकांचं नातं तुटल्याचं त्याने कबूल केलं होतं. आज दिलजीत दोसांझ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कलाकार आहे, परंतु दिवाळीसारख्या सणाबाबतची त्याची भावनिक पोकळी अजूनही मनाला भिडणारी आहे. दिलजीतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
४ वर्षांनी संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा भाग, असा होणार शेवट