रहिमतपूर : जयपूर (ता. कोरेगाव) येथील शिवनेरी शुगर्स प्रा. लि. कारखान्याच्या परिसरात जमिनीच्या हद्दीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात कोयत्याने वार केल्याने दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सुरेश शेलार (वय ४०, रा. एकसळ), मित्र सनी व इतर दोघे, तसेच सोमनाथ कृष्णात निकम, श्रीकांत कृष्णात निकम (वय ४३, रा. जयपूर) आकाश गायकवाड व अनोळखी सहा जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, की शिवनेरी कारखान्याच्या परिसरातील गट क्रमांक १६६ मध्ये जागेमध्ये दोन गटामध्ये वाद सुरू आहे. या विवादीत जागेमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करीत असताना काम थांबविण्याच्या कारणावरून दोन्ही गटात भांडण सुरू झाले. त्याचे पर्यावसन झाल्याने कोयता, दगडाने मारहाण झाली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या सोमनाथ निकम (रा. जयपूर) आणि सचिन शेलार (रा. एकसळ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
निकम यांच्या डोक्यावर कोयत्याचे वार झाले असून, शेलार यांच्या पायाला बोलेरोच्या टायरचा धक्का बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोघांनाही सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. रहिमतपूर पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू खुडे करीत आहेत.