अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीयेत. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, ज्यामध्ये 25 टक्के अतिरिक्त टॅरिफचा समावेश आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी ट्रम्प यांची मागणी आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून रशियाला युक्रेनविरोधात युद्धासाठी फंड उपलब्ध होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा भारताच्या ऊर्जा धोरणावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला आहे. जर भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली नाही तर भारताला आहे त्याही पेक्षा प्रचंड टॅरिफचा सामना करावा लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना असा विश्वास दिला आहे की, भारत रशियाकडून तेलाची खरेदी बंद करेल. भारताकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, बदललेली जागतिक परिस्थिती पहाता ऊर्जास्त्रोतांच्या
विविधीकरणावर भर दिला जात आहे.
ट्रम्प यांचा भारताला इशारा
एअर फोर्स वन मीडियासोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. भारतानं जर रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली नाही तर त्यांना आहे त्यापेक्षाही खूप अधिक टॅरिफचा सामना करावा लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, भारत देखील आता रशियाकडून तेलाची खरेदी कमी करत आहे, आणि त्यांनी तसा आपल्याला विश्वास दिल्याचही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे. भारताकडून मिळत असलेल्या पैशांचा रशिया युक्रेनविरोधात वापर करत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे अमिरेकेनं लावलेला टॅरिफ हा अन्यायकारक असल्याचं म्हणत भारताकडून या टॅरिफचा निषेध करण्यात आला आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून असा देखील पुन्हा एकदा दावा करण्यात आला आहे की, मीच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध विराम घडवून आणला होता. जर युद्ध थांबलं नाही तर आपण दोन्ही देशांवर देखील 200 टक्के टॅरिफ लावू असा इशारा दिला होता, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध विराम झाला असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.