Pratap Sarnaik: पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!
esakal October 23, 2025 07:45 AM

धनंजय शेटे

भूम : आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरटी, शिवारं आणि गोठे वाहून नेले होते.

मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यांत पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहून गेली आहेत अथवा मृत पावली आहेत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली जाणार आहे!

जाता मरणाचे भय, आली जगण्याची भीती !

नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना मंत्री सरनाईक म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील जेष्ठ सतीश मातने यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र लिहिले. तसेच साडेसागवी येथे शेतकऱ्यांनी सरनाईक यांची भेट घेत पशुधन देण्यात यावे अशी मागणी केली होती .शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या साथीदार असलेल्या दुभतु जनावरे अवकाळी पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेली तर काही मृत पावली त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणाच कोलमडून पडला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी दुपती जनावरे द्यावी, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

अर्थात, दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरनाईक कुटुंबांकडून विशेष भेट दिली जाते. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देणाऱ्या आपल्या नेतृत्वाला आगळया- वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भेट द्यावी या उद्देशाने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे महापुरामध्ये वाहून गेली, अशा शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याकरिता त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून १०१ दुभती गोवंश जनावरे भेट देऊन शेतकरी कुटुंबांच्या जीवनात नवचैतन्य फुलविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

या प्रसंगी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,

“आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले — पिकं, भांडीकुंडी, संसारातील लहानसहान वस्तूंसह त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेली जनावरंही वाहून गेली. शेतकऱ्यांचा संसार पुन्हा उभा राहावा, म्हणून आम्ही त्यांना दुधाळ गोवंश भेट म्हणून देत आहोत. या जनावरांच्या माध्यमातून त्यांचा संसार नव्याने बहरो, हीच आमची खरी दिवाळी भेट आहे.”

ते पुढे म्हणाले,

“शेतकऱ्यांचा संसार फक्त सरकारी मदतीवर उभा राहणार नाही. आपण सर्वांनी समाजभावनेतून पुढे येऊन त्यांना हात द्यावा. कारण शेतकऱ्याला उभं करणं म्हणजे आपल्या भूमीचं, आपल्या अन्नदात्याचं पुनर्जन्म घडवणं आहे.” या अनोख्या दिवाळी उपक्रमामुळे धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. काळ्या ढगांनी व्यापलेले आकाश आता उजळले आहे आशेचा दीप पुन्हा पेटला आहे.

अग्रलेख : …का झाली गतप्रभ तारांगणे?

“ही फक्त दिवाळी भेट नाही, तर एका उद्ध्वस्त संसाराला पुन्हा सजीव करण्याचा पवित्र संकल्प आहे,” असं या उपक्रमाचं सार सांगत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता नव्या उमेदीनं नवजीवनाचं स्वागत करत आहेत.

तालुक्यातील अतिवृष्टीने महापूर येऊन शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले होते व काही मरण पावले होते .त्यांना या पशुधनामुळे थोड्या प्रमाणात का होईना आधार होणार आहे .पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आम्हाला पशुधनाची मदत दिल्यासदूध व्यवसायातून आमच्या कुटुंबाचा गाडा पुढे चालणार आहे .

विश्वनाथ दातखिळे

शेतकरी बेलगाव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.