कराडमधल्या मंगल आबा आवळे मार्चपासून रिक्षा चालवत आहेत. त्यांना गेल्या सात महिन्यांत आलेले अनुभव मजेशीर आहेत. त्यांनी पहिल्यांदाच वाहन चालवलं तेही रिक्षा. वयाच्या 65 व्या वर्षी नवं शिकण्याची त्यांची इच्छा पाहून अनेकजण अवाक होत आहेत.
कराडच्या आजींचा विषयच वेगळा आहे. वयाच्या 65 व्या वर्षी सातारा जिल्ह्यातील कराडमधल्या मंगल आबा आवळे यांनी स्टीअरिंग हातात घेतलं आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली. आयुष्यभर शेतमजुरी करणाऱ्या मंगल आजींनी या वर्षी मार्च महिन्यापासून रिक्षा चालवायला घेतली. घरात पडून असलेल्या रिक्षेतून आता त्या रोज प्रवासी घेऊन कराड शहरात फिरतात. आणि त्यांच्यासोबत फिरते एक प्रेरणादायी आणि लई भारी कहाणी.
मंगल आजींनी याआधी कधीच कोणतंही वाहन चालवलं नव्हतं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी शेतमजुरी करून चार मुलांना शिक्षण दिलं. मुलगा एसटी ड्रायव्हर आहे. त्यानं रिक्षा घेतल्यावर आजींनी त्याला म्हटलं, "मला शिकव, थोडाफार हातभार लावीन." सुरुवातीला त्या ब्रेकला 'हॅण्डल' आणि हॅण्डलला 'ब्रेक' म्हणायच्या, त्या हसत हसत सांगतात. पण केवळ काही दिवसांत त्यांनी आत्मविश्वासानं रिक्षा शिकून घेतली. त्यांचं धाडस पाहून आरटीओनं त्यांना लायसन्स मिळवून दिलं.
आज मंगल आजी रिक्षा स्टॅण्डवर उभ्या असतात आणि ग्राहकांना आवाज देतात, तेव्हा अनेकजण थक्क होतात. 'ग्राहक विचारतात की ड्रायव्हर कुठे आहे? मीच म्हणते, मीच ड्रायव्हर आहे!' हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास असतो. कॉलेजच्या मुली तर आजीची रिक्षा आली म्हणत त्यांच्याच गाडीत बसतात. आजींचा तरुणांना सल्ला एकच 'धाडस वाढल्याशिवाय काही नाही. मागं पडू नका. कामधंदा नाही म्हणून घरी रडत बसू नका. कुठलंही काम करा.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)