हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचं सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून जे आजारी होते. अखेर वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. असरानी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक प्रभावी भूमिका साकारल्या होत्या. आता त्यांच्या निधनानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असरानी यांच्या निधनाच्या दहा दिवस आधीचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओमध्ये तते खूप खुश दिसत आहेत. वयाच्या 84 व्या वर्षीही ते आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल हो असलेल्या या व्हिडीओमध्ये असरानी एका कार्यक्रमात मंचावर हसताना आणि नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या सकारात्मकतेचा आणि आयुष्याबद्दलच्या उत्साहाचा पुरावा बनला आहे. हा व्हिडीओ गायिका पिंकी मैदासानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक सिंधी गाणं गात असून त्या गाण्यावर असरानी थिरकले. ‘फक्त दहा दिवसांपूर्वी.. ते स्टेजवर सिंधी गाण्यावर नाचत होते. वाह, ते किती अद्भुत जीवन जगले. एक खरे रत्न आहेत’, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
असरानी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘त्यांनी प्रत्येक पात्र इतक्या प्रामाणिकपणे आणि कौशल्याने साकारलं आहे की ते नेहमीच लक्षात राहतील’, असं एकाने लिहिलं. तर ‘आयुष्य भरभरून जगणारा कलाकार’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
असरानी यांनी त्यांच्या पाच दशकांच्या करिअरमध्ये जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. ते त्यांच्या अचूक विनोदी टायमिंगसाठी ओळखले जायचे. 1967 मध्ये त्यांना ‘हरे काँच की चुडियाँ’ या हिंदी चित्रपटात पहिली भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी काही गुजराती चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 1970 च्या उत्तरार्धात असरानी यांच्या कारकिर्दीची लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. ‘आज की ताजा खबर’, ‘रोटी’, ‘चुपके चुपके’, ‘छोटी सी बात’, ‘रफू चक्कर’, ‘शोले’, ‘पती पत्नी और वो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची चार्ली चॅप्लिनच्या पेहरावातील जेलरची भूमिका आणि डायलॉग्स लोकप्रिय ठरले.