सरकारी कंपनीचा Dividend मिळवण्याची शेवटची संधी, आज शेअर्स खरेदी करावा लागणार
ET Marathi October 23, 2025 06:45 PM
मुंबई : सरकारी मालकीची रेल्वे कंपनी आयआरएफसी लिमिटेडने तिमाही निकालानंतर त्यांच्या शेअरधारकांना लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश प्रति शेअर १.०५ रुपये दिला जाईल. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख २४ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. IRFC Limited ने सांगितले आहे की लाभांश घोषणेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत दिला जाईल.



IRFC Limited ने २४ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की २३ ऑक्टोबरपर्यंत आयआरएफसीचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार या अंतरिम लाभांशासाठी पात्र असतील. मात्र, २४ ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार लाभांशासाठी पात्र राहणार नाहीत. कारण आता ट्रेडिंग टी+१ सेटलमेंट नियमांतर्गत चालते. म्हणजेच शेअर्स खरेदी केल्यानंतर एक दिवसांनंतर डिमॅट खात्यात जमा होतात. .



३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि पहिल्या सहामाहीत आयआरएफसीची कामगिरी चांगली होती. कंपनीचे एकूण उत्पन्न ६,३७१.९१ कोटी रुपये होते. तर सहामाही महसूल १३,२९०.१५ कोटींवर पोहोचला. या कालावधीत करपश्चात नफा (पीएटी) ३,५२२.६७ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३,१८९.४७ कोटींपेक्षा १०.४५% जास्त आहे.



कंपनीच्या कामकाजातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. पहिल्या सहामाहीत आयआरएफसीने अक्षय ऊर्जा, वीज निर्मिती, ट्रान्समिशन, कोळसा खाणकाम आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यासारख्या रेल्वेशी संबंधित प्रकल्पांमध्ये ३,४५,३८२ कोटींचे नवीन करार केले. मागील आर्थिक वर्षातील फक्त ५,२५० कोटींपेक्षा ही लक्षणीय वाढ आहे.



आयआरएफसीचे शेअर्स गुरूवारी वाढून १२५.४० रुपयांवर व्यवहार कर त आहेत. गेल्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत ५.४९% घट झाली आहे. एका वर्षात या शेअरमध्ये ९.१७% घट झाली आहे. दरम्यान, चालू वर्षात, २०२५ मध्ये या शेअरने १६.८३% नकारात्मक परतावा दिला आहे. आयआरएफसीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६६.९० रुपये आणि नीचांक १०८.०४ रुपये आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.