दिवाळीत मुलींच्या स्टेटसवर वाजणाऱ्या 'सुंदरी सुंदरी' गाण्यातील 'टक टक देखरो'चा अर्थ माहितीये का? संजू राठोड म्हणतोय तरी काय?
esakal October 23, 2025 02:45 PM

सध्या मराठी संगीत क्षेत्रात २८ वर्षीय तरुण गायक संजू राठोडने धुमाकूळ घातला आहे. त्याचे हटके बीट, रॅप, अनोखी चाल आणि व्हिडिओंमुळे त्याची गाणी सुपरहिट होत आहेत. त्याने 'गुलाबी साडी' या गाण्याने प्रेक्षकांची झोप उडवली होती. त्याच्या 'शेकी शेकी' या गाण्याने देखील प्रचंड लोकप्रियता मिळवली. सध्या त्याचं नवं गाणं 'सुंदरी सुंदरी' प्रचंड गाजतंय. युट्युबवर सर्वाधिक पाहिलेल्या पहिल्या तीन म्युझिक व्हिडिओंमध्ये या गाण्याचा समावेश झालाय. या गाण्यातील 'टक टक देखरो सावरियाँ' हा भाग सोशल मीडियावर रिल्ससाठी वापरला जातोय. मात्र तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहितीये का?

प्रचंड संघर्षानंतर मिळालं यश

संजू राठोड हा बंजारा समाजातील आहे. त्याचं बालपण खडतर परिस्थितीत तांड्यावर गेलं. मात्र, अथक मेहनतीच्या जोरावर आज तो यशाच्या शिखरावर पोहोचलाय. त्याच्या 'सुंदरी' गाण्याला युट्युबवर अवघ्या एका महिन्यात तब्बल ४ कोटी ४७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका मुलाखतीत संजू राठोडने नेपाळमधील मराठी गाण्यांच्या क्रेझबद्दल सांगितलेलं. तो म्हणाला, "नेपाळमध्ये मराठी गाणी खूप ऐकली जातात. माझं 'शेकी शेकी' गाणं भारतात ट्रेंड होण्यापूर्वी नेपाळमध्ये टॉप १० मध्ये होतं आणि तिथे टिकटॉकवरही गाजत होतं."

'टक टक देखरो सावरियाँ' चा अर्थ काय?

'टक टक देखरो सावरियाँ' हे शब्द खूप लोकप्रिय झाले असले तरी, अनेकांना त्याचा नेमका अर्थ माहिती नाही. संजू राठोडच्या 'सुंदरी' गाण्यामधला जो भाग व्हायरल झाला आहे त्याचे शब्द असे आहेत.

टक टक देख रो सावरियाँ

टक टक देख रो सावरियाँ

मामी वरा देख देखरा नाचरी

देखो कथो नाचरो सावरियाँ

हा आहे त्याचा अर्थ

तो मुलगा आश्चर्याने टक लावून पाहतोय,

तो मुलगा आश्चर्याने टक लावून पाहतोय,

आई बघ ती मुलगी कशी छान नाचतेय,

बघ ती किती सुंदर नाचतेय.'

'टक टक देखरो सावरियाँ' या ओळींतून तो सांगतो की, ती मुलगी इतकी सुंदर आणि आकर्षक आहे की, प्रियकर (सावरियाँ) तिच्याकडे केवळ एकटक पाहतच राहिला आहे, तिच्या नृत्याचे आणि सौंदर्याचे कौतुक करत आहे.

संघर्षाचा काळ आणि कर्ज

संजूने त्याच्या संघर्षाच्या आठवणी सांगताना म्हटलं की, 'छंद लागला' गाण्याच्या शूटिंगसाठी २५ हजार रुपयांचे बजेट होते. परंतु, सतत पाऊस पडत असल्यामुळे त्याला व्याजाने पैसे घ्यावे लागले, ज्यामुळे त्याच्यावर मोठं कर्ज झालं. पैसे परत करू न शकल्यामुळे काही मित्रांनी त्याला खूप शिवीगाळ केली आणि घरी येऊन त्रास दिला. संजू म्हणाला, "माझे वडील शेतकरी आहेत, वेल्डिंगचं काम करतात. त्यांनी मला शिकवण्यासाठी कर्ज घेऊन शहरात आणलं होतं. पण मी शिक्षण सोडून गाण्यासाठी मुंबईत आलो. स्ट्रगलच्या काळात वडिलांना तोंड कसं दाखवायचं या विचाराने मी खूप चिंतेत असायचो. यापेक्षा मेलेलं बरं असे नकारात्मक विचारही मनात यायचे. मी ४-५ दिवस झोपलोही नव्हतो." 'डिंपल' हे त्याचं पहिलं मराठी गाणं होतं, ज्याला १५ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. "गुलाबी साडीतील अभिनेत्री माझी मैत्रीण होती आणि पैसे नसल्यामुळे जुगाड करून ते गाणं बनवलं होतं," असं संजूने सांगितलं.

४ वर्षांनी संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा भाग, असा होणार शेवट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.