काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमेवर संघर्ष झाला आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. या दोन्ही देशांमधील सीमा बंद झाली आहे, त्यामुळे पाकिस्तानात महागाईचा कहर पहायला मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोच्या किमती जवळजवळ पाच पटीने वाढल्या आहेत. टोमॅटो 600 रुपये तर आले 750 रुपये किलो दराने विकले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावामुळे 11 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमधील 2600 किलोमीटर सीमेवरील सर्व गेट बंद आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार थांबला आहे. गोळीबार आणि पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही काळातला हा सर्वात मोठा संघर्ष आहे. मात्र आता या युद्धाचा फटका सामान्य जनतेला बसताना दिसत आहे.
काबूलमधील पाकिस्तान अफगाणिस्तान चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख खान जान अलोकझाई यांनी सांगितले की, व्यापार थांबल्यामुळे दोन्ही देशांना अंदाजे 1 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. याआधी दररोज सुमारे 500 कंटेनर भाज्यांची निर्यात केली जायची, मात्र आता व्यापार थांबला आहे. त्यामुळे माल खराब झाला आहे. सध्या दोन्ही बाजूंच्या सीमेवर 5000 कंटेनर माल अडकला आहे. परिणामी बाजारात टोमॅटो, सफरचंद आणि द्राक्षे या फळांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये फळे, भाज्या, खनिजे, औषधे, गहू, तांदूळ, साखर, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार होतो. मात्र सीमा बंद झाल्यामुळे हा व्यापार बंद पडला आहे. यामुळे जनतेला या वस्तूंसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. टोमॅटो 600 पाकिस्तानी रुपये किलोने विकले जात आहेत. तसेच सफरचंदांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
रावळपिंडी भाजीपाला बाजार व्यापारी संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, टोमॅटोचा पुरवठा कमी आहे, तर मागणी जास्त आहे त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लहान भाजी विक्रेत्यांनी टोमॅटो, वाटाणे, आले आणि लसूण विकणे बंद केले आहे. लसूण प्रति किलो 400 रुपये आणि आले 750 रुपये (पाकिस्तानी रुपये) किलोने विकले जात आहे. तसेच कांदे 120 रुपये आणि वाटाण्याचा दर 500 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.