भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना एडिलेडमध्ये पार पडला. या सामन्यातही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. ऑस्ट्रेलियासमोर 264 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान काही रोखता आलं नाही. त्यात भारतीय क्षेत्ररक्षण एकदम गचाळ झालं. एक नाही तर तीन झेल सोडले. या सामन्यात कुलदीप यादवची उणीव प्रकर्षाने जाणवली. तर प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांना संधीच मिळाली नाही. असं असलं तरी प्लेइंग 11 बाहेर असलेला ध्रुव जुरेल चर्चेत आला आहे. कारण भारताचा कर्णधार शुबमन गिल ध्रुव जुरेलची जर्सी परिधान करून मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला होता. ऑस्ट्रेलियात कडाक्याची थंडी वाजत होती. त्यात कर्णधार शुबमन गिल किट आणायला विसरला होता. त्यामुळे त्याने ध्रुव जुरेलचं स्वेटर परिधान करून मैदानात उतरला होता. त्याच वेळी बदली खेळाडू म्हणून ध्रुव जुरेलही फिल्डिंग करत होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पण त्याच्या जर्सीमागे लिहिलेलं ध्रुव जुरेल नाव पाहून मैदानात उपस्थित प्रेक्षकांचा संभ्रम वाढला. दोन ध्रुव जुरेल फिल्डिंग करत असल्याचा भास झाला. इंग्लंडमध्ये पंतच्या जागी जुरेल विकेटकीपिंगसाठी मैदानात उतरला होता. तसंच काहिसं झालं नाही ना… पण नंतर उपस्थितांच्या लक्षात आलं की गिल त्याचं किट आणण्यास विसरला आहे. त्यामुळे त्याने जुरेलकडे स्वेटर मागितलं आणि परिधान केलं. जुरेलने अद्याप 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलेले नाही.
कर्णधार शुबमन गिल दोन्ही सामन्यात चांगली फलंदाजी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात 10 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात फक्त 9 धावा करून बाद झाला. कर्णधार म्हणून कसोटी आणि वनडे कारकिर्दीची सुरुवात पराभवाने करण्याचा नकोसा विक्रम गिलने आपल्या नावावर केला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसह 2027 च्या वनडे विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. पण आता त्याला आणखी लक्ष घालून संघाची बांधणी करावी लागणार आहे. भारताचा या मालिकेतील शेवटचा सामना ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.