भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतून वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून ते शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला काही प्रयोग नडल्याचं दिसून आलं आहे. दोन सामन्यात आखलेली रणनिती पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून आलं आहे. खेळाडूंची कामगिरी सुमार राहिली. या व्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा आडमुठेपणा नडल्याची चर्चा रंगली आहे. दोन सामन्यात तीन अष्टपैलू खेळाडू खेळवल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे संघाला फायदा नाही तर तोटाच झाल्याची टीका होत आहे.
दोन्ही वनडे सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला वगळण्यात आलं. त्याला प्लेइंग 11 मध्ये काही जागा मिळाली नाही. यात अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकी अष्टपैलू होते. तर नितीश कुमार रेड्डी वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून संघात होता. फलंदाजीत खोली यावी यासाठी या तीन अष्टपैलूंची निवड केली होती. पण त्यामुळे गोलंदाजी कमकुवत झाल्याचं दिसून आलं. खरं तर दुसऱ्या भारताने 264 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान रोखणं तसं पाहीलं तर शक्य झालं असतं. पण तसं झालं नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत कुलदीप यादवची भूमिका महत्त्वाची ठरली असती. पण त्याला संधी मिळाली नाही.
पहिल्या वनडे सामन्यातील पराभवानंतर खरं तर यातून धडा घ्यायला हवा होता. दुसऱ्या वनडे सामन्यात तर कुलदीपची उणीव प्रकर्षाने जाणवली. ऑस्ट्रेलियाचा स्टार लेग-स्पिनर अॅडम झाम्पाने मधल्या फळीत भारताचे चार गडी बाद करत टीम इंडियाची धावगती रोखली होती. तशी कामगिरी कुलदीप यादव करू शकला असता. विशेषतः जेव्हा मॅथ्यूज शॉर्टपिच चेंडूंवर लक्ष केंद्रित करत होता. तेव्हा कुलदीपने त्याला बरोबर जाळ्यात ओढलं असतं. युवा कूपर कॉनोलीसाठी तर कुलदीप यादवचा कठीण पेपर असता. ऑस्ट्रेलियाने 187 धावांवर पाच विकेट गमावले होते. तेव्हा कुलदीप यादव प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवू शकला असता.