मुंबईची हवा बिघडली!
esakal October 24, 2025 02:45 AM

मुंबईची हवा बिघडली!
फुप्फुसाचे आजार बळावण्याची शक्यता, फटाक्यांचा गंभीर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : दिवाळीत धूर आणि विषारी घटक असणारे फटाके फोडण्यात येत असल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईतील प्रदूषण आणि तापमानाच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. दिवाळीदरम्यान हवेच्या प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. गेल्या चार दिवसांपासून फटाक्यांचा परिणाम आरोग्यावर होत आहे.
शहराची हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून, गुरुवारी (ता. २३) मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १११ एवढा होता. बुधवारी (ता. २२) हवा गुणवत्ता निर्देशांक ११० नोंदवला गेला. मंगळवारी (ता. २१) सर्वाधिक हवा गुणवत्ता निर्देशांक २१६ एवढा नोंदवला गेला, तर २० ऑक्टोबर रोजी १८८ एक्यूआय नोंदवला गेला असून, समाधानकारक स्थिती नोंदवली गेली होती.
गुरुवारी समाधानकारक स्थितीत हवेची गुणवत्ता असूनही दृश्यमानता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मुंबई शहरात सध्या धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. वाहनधारकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत.
पाडव्याच्या दिवसानंतर गुरुवारी बीकेसीत २०१ गंभीर श्रेणीतील हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला. बाकी इतर सर्व ठिकाणी परिस्थिती समाधानकारक होती. त्यापाठोपाठ बोरिवली पूर्वेकडील हवा गुणवत्ता निर्देशांक १७० एवढा नोंदला गेला. देवनार १४३, सीएसएमटी १२२, चकाला पूर्व १२८, माझगाव १५४ असे प्रमाण होते.
सध्या दम्याच्या आजारांनी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १० ते १२ टक्के प्रमाण वाढले आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डाॅ. रोहित हेगडे यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड म्हणाले की, मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच सर्दी, खोकला बरा होण्यासाठी अनेक दिवस लागत आहेत, असे त्यांनी सांगितले.

बीकेसीत सर्वाधिक प्रदूषण
सोमवारी (ता. २०) सर्वाधिक प्रदूषण बीकेसीत नोंदवले गेले. जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक दिवसभरात ३३५ इतका होता, तर मंगळवारी भायखळा येथे हवा गुणवत्ता निर्देशांक २१३ नोंदवला गेला. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित होते आणि हवेची गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीत पोहोचते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत विषारी रसायने आणि सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे खोकला, धाप लागणे आणि घशात खवखवणे यांसारखे त्रास जाणवतात. डोळे, कान आणि घसा प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्यामुळे संबंधित समस्या होऊ शकतात. फटाक्यांमधील विषारी रसायने आरोग्यावर दूरगामी परिणाम करतात. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, मळमळ आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी हे प्रदूषण अधिक धोकादायक असते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.