बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट
esakal October 24, 2025 02:45 AM

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीतलं वातावरण तापलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर असे आरोप केलेत. या आरोपानंतर महायुतीत धुसफूस सुरू आहे. धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी होणार अशा चर्चाही रंगल्या आहेत. दरम्यान, धंगेकर यांनी आणखी एक पोस्ट केल्यानं खळबळ उडाली आहे. धंगेकरांच्या पोस्टमुळे आता सोशल मीडिया वॉर सुरू झालं आहे.

मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवणाऱ्या धंगेकर यांना महायुतीत दंगा नको असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पण धंगेकर हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. पुणेकरांसाठी लढतच राहणार असल्याचं रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलंय. पक्षातून हकालपट्टी होणार अशा चर्चा होत असताना धंगेकर यांनी एक सूचक पोस्टही केली आहे. यात धंगेकर म्हणाले की, तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..! अशी ठाम भूमिका घेतली आहे.

Murlidhar Mohol : राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळताहेत, धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याच्या चर्चेदरम्यान धंगेकरांची पोस्टही चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय आणखी एक पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्टमधून माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण पोस्टमधून कोणाचे नाव न घेता ती व्यक्ती कोण आहे, हे फडणवीस साहेबांना माहित असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आणखी एक खळबळजनक पोस्ट धंगेकर यांनी केलीय. त्यात म्हटलंय की, २०२४ ला एक जण मिडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता, तो कोण आहे हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहित आहे. आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या बातम्या खोट्या बातम्या पेरतोय..! मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब…!!

एक्सवरील फोटो बदलला

सर्वात महत्वाचे म्हणजे धंगकेरांनी पक्ष कारवाईच्या खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचे म्हटले असले तरी त्यांची पोस्ट सूचक संदेश देत आहेत. त्यांचे एक्सवरील फोटोही बदलला असून, या फोटोच्या जागी आता सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट असे लिहिलेले दिसत आहे. यामुळे आता खरंच रवींद्र धंगेकरांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होणार की आणखी काय? हे पाहाणे महत्वाचे असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.