तुमच्या टूथब्रशवर असतात कोट्यवधी बॅक्टेरिया, तो किती दिवसात बदलावा?
BBC Marathi October 24, 2025 04:45 AM
Getty Images कधी-कधी जवळपासचा टॉयलेट फ्लश किंवा खिडकी उघडल्यावर हवा आल्यामुळे सूक्ष्मजीव टूथब्रशवर गोळा होतात.

तुमचा टूथब्रश म्हणजे एक छोटीशी इकोसिस्टम आहे. त्यात दररोज कोट्यवधी सूक्ष्मजीव (मायक्रोब) जन्माला येतात.

त्याचे तुटलेले आणि पसरलेले तंतू किंवा फायबर एखाद्या कोरड्या जमिनीसारखे असतात. अशी जमीन ज्याला प्रत्येक वेळेस पाणी लागल्यानंतर काही वेळासाठी ती ओली होते आणि पोषक घटकांनी भरून जाते. या प्लॅस्टिकच्या बारीक फायबरमध्ये लाखो सूक्ष्मजीव राहतात.

तुमच्या टूथब्रशवर आता जवळपास 10 लाखांपासून ते 1.2 कोटींपर्यंत जिवाणू आणि बुरशी असू शकते. ते शेकडो वेगवेगळ्या प्रजातींचे असतात. टूथब्रशवर ते एक जैविक थर निर्माण करतात.

काही तर टूथब्रशच्या जुन्या फायबरच्या किंवा तंतूच्या फटींमध्येदेखील शिरतात. दररोज आपण जेव्हा दात घासतो, तेव्हा त्यात पाणी, लाळ, त्वचेच्या पेशी आणि अन्नाचे छोटे-छोटे कण टूथब्रशवर येतात. या सर्व गोष्टी एकत्रितपणे जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

कधी-कधी जवळपासच्या टॉयलेटचा फ्लश किंवा खिडकी उघडल्यावर हवा आल्यामुळे येणाऱ्या सूक्ष्मजीवांचाही त्यात समावेश होतो. मग दिवसातून दोनवेळा आपण हेच मिश्रण आपल्या तोंडात टाकून चांगल्याप्रकारे फिरवतो.

मग आपला टूथब्रश किती स्वच्छ आहे, याची आपण चिंता करायला हवी का?

हा प्रश्न अनेक वर्षांपासून डेंटिस्ट आणि डॉक्टरांना हैराण करत आला आहे. याच कारणामुळे, ते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की आपल्या टूथब्रशवर कोणकोणते सूक्ष्मजीव असतात, ते किती धोकादायक असतात आणि आपण टूथब्रश कशाप्रकारे स्वच्छ ठेवायला हवा?

सूक्ष्मजीव कुठून येतात?

मार्क-केविन जिन जर्मनीतील राइन-वेल युनिव्हर्सिटी ऑफ ॲप्लाईड सायन्सेसच्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. त्या टूथब्रशवरील सूक्ष्मजीवांची वाढ किंवा संसर्गावर संशोधन करतात.

मार्क-केविन जिन म्हणतात, "टूथब्रशवर असणारे सूक्ष्मजीव मुख्यत: तीन ठिकाणांहून येतात. हे तीन स्त्रोत म्हणजे - आपलं तोंड, आपली त्वचा आणि जिथे टूथब्रश ठेवला जातो, ती जागा."

मात्र टूथब्रशचा वापर करण्याआधीच त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव असू शकतात.

ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात 40 नवीन टूथब्रशची तपासणी करण्यात आली. ते वेगवेगळ्या कंपन्यांचे होते. त्यातून आढळलं की त्यामध्ये आधीपासूनच अनेक प्रकारचे जिवाणू होते.

BBC

चांगली बाब म्हणजे बहुतांश सूक्ष्मजीव हानिकारक नसतात. यातील बहुतांश आपल्या तोंडातून येतात. प्रत्येक वेळेस जेव्हा दात घासतो, तेव्हा टूथब्रशचे तंतू, रोथिया डेन्टोकारियओसा, स्ट्रेप्टोकॉकस मायटिस आणि ॲक्टिनोमायसीज सारख्या आपल्या तोंडात असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या समूहांमधील जिवाणूंना गोळा करतात.

हे सर्व सामान्यपणे आपल्या तोंडात आढळतात. ते हानिकारक नसतात. यातील काही आपले दात किडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंपासून बचाव करण्यामध्ये मदत करतात.

अर्थात, यातील काही सूक्ष्मजीव असेही असतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असतात.

हानीकारक जिवाणू

ब्राझीलमधील युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोमधील डेंटिस्ट्रीचे प्राध्यापक विनिसियस पेद्राजी म्हणतात, "स्ट्रेप्टोकॉकी आणि स्टॅफिलोकॉकी हे सर्वात धोकादायक असतात. त्यांच्यामुळे दात किडतात. काही इतर जिवाणूंमुळे सूज येऊ शकते. त्याला पेरियोडॉन्टल डीझीज म्हणतात."

संशोधकांना असे जिवाणू आणि बुरशी आढळले आहेत जे सामान्यपणे टूथब्रशवर असता कामा नयेत. उदाहरणार्थ, ॲस्चेरिशिया कोलाय, स्यूडोमोनास ऐरूजिनोसा आणि अँटिबॅक्टेरिया, हे पोटातील संसर्ग आणि फूड पॉयझनिंगशी संबंधित असतात.

अभ्यासातून क्लेब्सीएला न्युमोनिएसारखे जिवाणू (जे हॉस्पिटलमधील संसर्गाचं सामान्य कारण असतात) आणि कँडिडा यीस्ट (जे थ्रश नावाची समस्या निर्माण करू शकतात) देखील टूथब्रशवर आढळले आहेत.

Getty Images बहुतांशजणांच्या बाथरुममध्येच टॉयलेटदेखील असतं आणि तिथूनच समस्या सुरू होतात

आपण ज्या पाण्यानं टूथब्रश धुतो, त्या पाण्यातूनदेखील हे सूक्ष्मजीव येऊ शकतात. ते आपले हात किंवा जिथे आपण टूथब्रश ठेवतो, तिथून येऊ शकतात. विचार केला, तर बहुतांश वेळा हे वातावरण म्हणजे आपलं बाथरुमच असतं.

बाथरुम ही गरम आणि आर्द्रता असणारी जागा असते. तिथे हवेत पाण्याचे बारीक थेंब म्हणजे एरोसोल तयार होत असतात. या थेंबांबरोबर जिवाणू आणि विषाणू हवेत पसरू शकतात. मार्क-केविन जिन यांच्या मते, याच कारणामुळे बाथरुममध्ये ठेवण्यात आलेल्या टूथब्रशवर लगेच संसर्ग (कॉन्टॅमिनेशन) होतो.

बहुतांश लोकांच्या बाथरुममध्येच टॉयलेटदेखील असतं. अशावेळेस परिस्थिती आणखी बिघडते.

टॉयलेट प्लूम म्हणजे फ्लशमधून येणारे बारीक थेंब

प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही टॉयलेट फ्लश करता, तेव्हा पाणी आणि मैला (विष्ठा) यांचे सूक्ष्म थेंब हवेत जवळपास 1.5 मीटर (जवळपास पाच फूट) पर्यंत पसरतात. या एरोसोल सारख्या थेंबांमध्ये जिवाणू आणि संसर्गजन्य विषाणूदेखील असू शकतात. उदाहरणार्थ फ्लू, कोविड-19 किंवा नॉरोव्हायरस, इत्यादी ज्यांच्यामुळे उलटी- हगवण यासारखे आजार होऊ शकतात.

जर तुमचा टूथब्रश टॉयलेटजवळ ठेवलेला असेल, तर फ्लशनंतर त्याचे सूक्ष्म थेंब टूथब्रशच्या तंतूंवर उडण्याची शक्यता असते. तेच तंतू नंतर तुम्ही दात घासण्यासाठी तोंडात टाकता. अर्थात संसर्गाचा जास्त धोका फ्लश करताना थेट श्वासाद्वारे असतो. मात्र तरीदेखील भविष्यात फ्लश करण्याआधी तुम्ही टॉयलेटचं सीट झाकणं अधिक योग्य ठरेल.

कॉमन बाथरुममध्ये ही समस्या आणखी मोठी होते. एका विद्यापीठातील अभ्यासातून असं समोर आलं होतं की अशा बाथरुममध्ये ठेवण्यात आलेल्या 60 टक्के विद्यार्थ्यांच्या टूथब्रशवर मैला किंवा विष्ठेशी संबंधित जिवाणू होते. अनेकदा एका व्यक्तीच्या टूथब्रशवर दुसऱ्या व्यक्तीचे जिवाणूदेखील जात होते.

Getty Images

अमेरिकेतील इलिनॉयमधील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक एरिका हार्टमॅन वातावरणात सूक्ष्मजीव जिवंत राहण्यावर संशोधन करतात. एरिका मात्र म्हणतात की टॉयलेट प्लूमबाबत त्यांना तितकी चिंता वाटत नाही, जितकी नेहमी केली जाते.

त्यांच्या अभ्यासात इलिनॉयमधील लोकांकडून घेण्यात आलेल्या 34 टूथब्रशवर मैला किंवा विष्ठेसंबंधित जिवाणू अंदाजापेक्षा खूप कमी आढळले आहेत. हार्टमॅन म्हणतात की आतड्यांशी संबंधित अनेक सूक्ष्मजीव हवेत आल्यानंतर खूप वेळ जिवंत राहत नाहीत.

त्या म्हणतात, "मला वाटत नाही की बहुतांश जण त्यांच्या टूथब्रशमुळे आजारी पडतात."

अर्थात काही संशोधनातून दिसून येतं की इन्फ्लुएन्झा आणि कोरोनाव्हायरस यांच्यासारखे काही विषाणू टूथब्रशवर अनेक तास जिवंत राहू शकतात. हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस-1 तर 48 तासांपर्यत जिवंत राहू शकतात. त्यांच्यामुळे कोल्ड सोर्स होतो.

Getty Images जर टूथब्रश एकत्र ठेवले जात असतील तर आरोग्यतज्ज्ञ सल्ला देतात की ते एकमेकांना चिकटून ठेवू नयेत, जेणेकरून एका ब्रशवरून संसर्ग दुसऱ्या ब्रशवर पसरणार नाही

याच कारणामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तुमचा टूथब्रश इतरांना वापरण्यास न देण्याचा सल्ला देतात. जर एकाच जागी अनेकजणांचे टूथब्रश ठेवले जात असतील, तर त्यांचा एकमेकांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. विशेषकरून, जे लोक तुमच्याबरोबर राहत नाहीत अशांचे ब्रश असतील तेव्हा.

मात्र हार्टमॅन यांना वाटतं की जे लोक सोबत राहतात, त्यांच्यासाठी ही तितकी मोठी चिंतेची बाब नाही.

त्या म्हणतात, "सोबत राहणाऱ्या लोकांच्या तोंडात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये अनेक प्रकारचं साम्य असतं. त्यामुळेच मला वाटत नाही की जवळ-जवळ ठेवलेल्या टूथब्रशमुळे ते होतं. उलट त्याचं थेट कारण आहे किसिंग किंवा वस्तूंचा सामाईक वापर."

यातील रंजक बाब म्हणजे टूथब्रशवर आढळणारे काही विषाणू आमच्यासाठी फायदेशीर देखील असू शकतात.

हार्टमॅन आणि त्यांच्या टीमला आढळलं की टूथब्रशवर बॅक्टीरियोफेज नावाचे विषाणूदेखील असतात. त्यांच्यामुळे मानवाला नाही तर जिवाणूंना संसर्ग होतो आणि त्यांची संख्या नियंत्रित राहण्यास मदत होते.

किती धोका आहे?

बहुतांश वेळा संसर्गाचा धोका खूप कमी असतो. जिन यांनादेखील तसंच वाटतं. मात्र ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते, त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब असू शकते. कारण त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

जिन यांचं संशोधन आणि अशाच प्रकारच्या इतर संशोधनांमध्ये, टूथब्रशवर आढळलेल्या जिवाणूंच्या डीएनएचं विश्लेषण करण्यात आलं होतं. त्यात आढळलं की काही जिवाणूंमध्ये अशी जनुकं असतात, जी त्यांना अँटीबायोटिक्सरोधक बनवते.

म्हणजेच जर या जिवाणूंमुळे संसर्ग पसरला तर त्यांच्यावर उपचार करणं कठीण होऊ शकतं.

अर्थात जिन म्हणतात की त्यांच्या अभ्यासात ही 'जनुक खूप कमी प्रमाणात' आढळली. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून 'मध्यम प्रमाणात असणं चिंते'ची बाब आहे.

तर इटलीतील विद्यार्थ्यांच्या 50 टूथब्रशवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असं आढळलं की सर्वांवरच असे जिवाणू होते, जे अनेक ओषधांच्या बाबतीत रोधक म्हणजे प्रतिकूल होते.

Getty Images टूथब्रशला खोलीच्या तापमानावर कोरडं होऊ देणं हा जिवाणूंची संख्या कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे

काही टूथब्रश असेही असतात, ज्यात अँटीमायक्रोबियल म्हणजे जिवाणूविरोधी थर देण्यात आलेला असतो. त्यात दावा केला जातो की यामुळे टूथब्रशवरील जिवाणूंची संख्या नियंत्रणात राहते.

मात्र बहुतांश अभ्यासातून असं आढळलं आहे की या उपायांचा कोणताही विशेष परिणाम होत नाही. उलट कधी-कधी त्यामुळे जिवाणूंच्या प्रतिकूल किंवा रोधक प्रजातींनादेखील चालना मिळू शकते.

प्रत्यक्षात, दात घासल्यानंतर टूथब्रशला सरळ स्थितीत खोलीच्या तापमानावर कोरडं होऊ देणं हाच जिवाणूंची संख्या कमी करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. इन्फ्लुएन्झा आणि कोरोनाव्हायरस यांच्यासारखे अनेक विषाणू कोरडे झाल्यावर तुटू लागतात.

स्ट्रेप्टोकॉकस म्यूटन्ससारखे जिवाणू दात किडण्यामागचं मुख्य कारण असतात. ते टूथब्रशवर आठ तासांपर्यत जिवंत राहू शकतात. मात्र 12 तासानंतर त्यांचा मृत्यू होऊ लागतात.

अमेरिकन डेंटल असोसिएन आणि अमेरिकतील रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) देखील हाच सल्ला देत आहेत की टूथब्रशच्या डोक्याकडच्या भागाला झाकून किंवा बंद डब्यामध्ये ठेवू नये. कारण यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या वाढू शकते.

टूथब्रश कसा स्वच्छ ठेवावा?

टूथब्रश जिवाणूमुक्त करण्याचे अनेक मार्ग सांगितले जातात. अल्ट्राव्हॉयोलेट प्रकाशापासून ते डिशवॉशर किंवा मायक्रोव्हेवमध्ये ठेवण्यापर्यंत. काही पद्धती तर पूर्णपणे निष्फळ ठरल्या आहेत.

उदाहरणार्थ, हेअर ड्रायरनं कोरडं करणं किंवा ब्रशला व्हिस्कीच्या ग्लासमध्ये बुडवणं. मायक्रोव्हेवला सर्वसाधारणपणे सर्वात प्रभावी मानलं जातं. मात्र यामुळे टूथब्रशचे तंतू विरघळण्याचा किंवा खराब होण्याचा देखील धोका असतो.

तुमचं टूथपेस्ट, ज्यात सर्वसाधारणपणे जिवाणूरोधक घटक असतात, ते टूथब्रशवर असणाऱ्या सूक्ष्मजीवांना एका मर्यादेपर्यंत कमी करू शकतं. पाण्यानं धुतल्यावर देखील काही जिवाणू निघून जातात. मात्र तरीदेखील बरेचसे ब्रशला चिकटलेले राहतात आणि त्यांची वाढ होत राहते.

काही संशोधक सल्ला देतात की एक टक्का व्हिनेगरचं द्रावण जिवाणूचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग ठरू शकतो. मात्र त्यामुळे टूथब्रशवर त्याची थोडीशी चव राहते. ती दात घासताना थोडी खराब लागू शकते. टूथब्रशच्या डोक्याकडच्या भागाला अँटीसेप्टिक माऊथवॉशमध्ये पाच ते दहा मिनिटांपर्यंत भिजवून ठेवणं हा देखील एक प्रभावी मार्ग आहे.

जुन्या टूथब्रशचे तुटलेले आणि घासलेले तंतू जिवाणू, आर्द्रता आणि पोषक घटकांना जास्त काळ पकडून ठेवतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची संधी निर्माण होते.

याच कारणामुळे अमेरिकन डेंटल असोसिएशन सारख्या संस्था तर तीन महिन्यांमध्ये टूथब्रश बदलण्याचा सल्ला देतात आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांनी टूथब्रश आणखी लवकर बदलला पाहिजे.

Getty Images तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलला पाहिजे

जिन यांच्या संशोधनातदेखील आढळलं की टूथब्रशवरील जिवाणूंची संख्या टूथब्रशचा वापर सुरू केल्यानंतर जवळपास 12 आठवड्यांनी त्याच्या कमाल पातळीवर पोहोचते.

काही संशोधक आता एका वेगळ्या दिशेनं काम करत आहेत. ते म्हणजे अशी पद्धत ज्यात टूथपेस्टवर काम करत आहेत, जे 'चांगल्या' जिवाणूंच्या वाढीला चालना देतं. या प्रोबायोटिक टूथपेस्टचं उद्देश तोंडात फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढवणं हा आहे.

उदाहरणार्थ, स्ट्रेप्टोकॉकस सॅलिव्हेरियस नावाचा जिवाणू हानिकारक जिवाणूंचं दमन करण्याचा आणि प्लाक बनण्यापासून रोखण्यास मदत करतो. यासंदर्भात न्यूझीलंडमधील एक कंपनी चाचणी करत आहे.

आणखी एक जिवाणू लिमोसिलॅक्टोबॅसिलस रॉयटेरी स्ट्रेप्टोकॉकस मूटन्सशी मजबूत स्पर्धा करतो. यामुळे दात किडण्यापासून वाचवले जाऊ शकतात.

जिन म्हणतात, "प्रोबायोटिक कोटिंग्स किंवा बायोॲक्टिव्ह ब्रिसल मटीरियल यासारखे विचार भविष्यात निरोगी सूक्ष्मजीवांचं संतुलन साधण्यासाठी नवीन पद्धती बनू शकतात. म्हणजे टूथब्रशला संसर्गाचं नाही तर सुरक्षेचं माध्यम बनवलं जाऊ शकतं."

मात्र जिन असंही मानतात की या क्षेत्रात अद्याप बरंच संशोधन केलं जायचं बाकी आहे.

तोपर्यंत, तुमच्या बाथरुमध्ये ठेवलेल्या टूथब्रशकडे जरा नीट पाहा. तो बदलण्याची वेळ झाली आहे का? किंवा त्याला बहुधा टॉयलेटपासून थोड्या अंतरावर ठेवणं अधिक योग्य ठरेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • दात कसे घासावेत? दात घासण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
  • केसांपासून बनलेल्या टूथपेस्टचे होऊ शकतात हे फायदे; दात राहतील मजबूत, थांबेल झिज
  • दातांचं दुखणं कायमचं थांबवण्यासाठी 'या' 7 गोष्टी टाळा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.