-११४ वर्षांचा डाकबंगला होणार लवकरच जमिनदोस्त
esakal October 25, 2025 12:45 PM

- rat२४p१.jpg-
P२५O००१२५
संगमेश्वर ः माभळे येथील डाकबंगला.
----------
ऐतिहासिक डाकबंगला आता इतिहासजमा
माभळेतील वास्तू ; चौपदरीकरणामुळे बुलडोजर फिरणार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः ब्रिटिशकाळात त्यांच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या निवासासाठी उभारलेले डाकबंगले आजही कोकणची शान म्हणून ओळखले जात आहेत. संगमेश्वर येथे १९११ ला सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमासमोर उभारलेला आणि हेरिटेज वास्तू म्हणून ओळखला जाणारा डाकबंगला आता चौपदरीकरणादरम्यान ११४ वर्षानंतर थोड्याच दिवसात जमीनदोस्त होणार आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम आता वेगाने हाती घेण्यात आले आहे. चौपदरीकरणात संगमेश्वर येथील ब्रिटिशकालीन डाकबंगला उद्ध्वस्त होणार आहे. सर्वेक्षण करताना अथक प्रयत्न करूनही १९११ ची ब्रिटिशकालीन हेरिटेज वास्तू वाचवणे अशक्य झाले. माभळे परिसरात रखडलेले चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी माभळे येथील या डाकबंगल्याचे फार थोडे दिवस बाकी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वातंत्र्यानंतर हा आणि अन्य डाकबंगले लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही उपलब्ध होत आहेत. संगमेश्वरच्या या डाकबंगल्याबाबत सर्वांच्याच आठवणी आनंददायी असल्याने चौपदरीकरण करताना तो पाडावा लागणार असल्याचे कळल्यानंतर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
---
चौकट
माझं घर पाडल्याची भावना
गेली अनेक वर्षे माभळे येथील या डाकबंगल्यात तत्कालीन मुकादम म्हणून काम करणाऱ्या शिरी खानविलकर यांनी हा डाकबंगला पाडणं म्हणजे माझं घर पाडल्यासारखं दु:ख आपल्याला होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. २०११ ला या डाकबंगल्याला जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली त्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन शतक महोत्सव साजरा केला होता. आज या सर्व आठवणी परत एकदा दाटून आल्याचे खानविलकर यांनी सांगितले. आता ११४ वर्षानंतर काही दिवसातच हा डाकबंगला पाडला जाणार असल्याने तत्पूर्वी आपण त्याच्या पायरीसमोर नतमस्तक होणार आहोत, असे शिरी खानविलकर यांनी नमूद केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.