जैन बोर्डींग प्रकरणी व्यवहार प्रकरणात भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी मोहोळ पुण्याचे महापौर असताना महापालिकेची पाटी लावून कोथरुडच्या बिल्डर बढेकर यांची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील जैन समाजाच्या जमीन व्यवहाराप्रकरणावरुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर रविंद्र धंगेकर यांनी रोज नवनवीन आरोप करत आहेत. यावर आपण आधीच भूमिका मांडली आहे.परंतू आता आपल्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे.लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली आहे. राजकीय नैराश्यातून आपल्यावर वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. ज्यांना राजकारणात कोणी विचारत नाही अशांच्या आरोपांना काय उत्तर देणार असे मोहोळ यांनी बचाव करताना म्हटले आहे. तर आपण वैयक्तिक कोणताही आरोप करत नाही. जर वैयक्तिक पातळीवर उतरलो तर त्यांना पुणे सोडून जावे लागेल असा हल्लाबोल रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या मोहोळ यांच्यावरील रोजच्या आरोपाने पुण्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. अशा वातावरणात आज सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. ही भेट किती वेळ झाली आणि या भेटीत मोहोळ यांची फडणवीस यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली हे कळलेले नाही. मात्र, अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने यास महत्व आल्याचे म्हटले जात आहे.
येथे पोस्ट पाहा –
योगायोग !पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात.
मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो,मोहोळ हे खासदार होण्याच्या… pic.twitter.com/01zmvCUrnj
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii)
पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. मोहोळ यांच्यावर आज त्यांनी आणखीन एक आरोप केला आहे. मोहोळ हे खासदार होण्याआधी पुण्याचे महापौर असताना पुणे महानगर पालिकेची शासकीय पाटी लावून पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे.त्या गाडीचा नंबर होता Mh12 SW 0909 असा होता.
ही कार मोहोळ यांची नव्हती की ते शासकीय वाहन नव्हते. त्यांची ही कार कोथरूडचे बांधकाम व्यावसायिक बढेकर यांची असल्याचा गौप्यस्फोट रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. महापौर असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे नितीमत्तेला धरुन आहे काय असा सवाल धंगेकर यांनी केला आहे. हेच तेच बांधकाम व्यावसायिक आहेत, ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर असावे हा योगायोग नक्की नाही असेही धंगेकर यांनी म्हटले आहे.