‘अतिथी देवो भव’ला काळिमा
श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची टवाळगिरी, पादचाऱ्यांवर थुंकण्याचे प्रकार
श्रीवर्धन, ता. २५ (वार्ताहर) ः दिवाळी सुट्टीनिमित्त श्रीवर्धनमध्ये पर्यटक दाखल झाले आहेत; पण काही टवाळ पर्यटक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, कर्कश आवाजातील धिंगाणा, चालत्या वाहनातून पादचाऱ्यांवर थुंकल्याच्या गैरप्रकारामुळे ‘अतिथी देवो भव’च्या भावनेला ठेच लागली आहे.
पावसाळी चार महिन्यांत पर्यटन व्यवसायाला काही प्रमाणात मंदी जाणवते. मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने अद्यापही विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे श्रीवर्धन येथील पर्यटन व्यवसाय थंडावला होता. अशातच दिवाळीची सुट्टी, चौथा शनिवार आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्याने एकीकडे व्यावसायिक सुखावले आहेत; पण दुसरीकडे टवाळ पर्यटक स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरात प्रवेश करणारे टवाळ पर्यटक रिकाम्या बाटल्या, पिशवीतील अन्नपदार्थ जाणीवपूर्वक पादचाऱ्यांच्या अंगावर भिरकावत आहेत. तर काहीजण खिडकीतून डोके बाहेर काढत पाण्याच्या चुळा, तंबाखूच्या पिचकाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर मारत असल्याने असे प्रकार वादविवादाला निमित्त ठरत आहेत.