एमडी विक्रीचा डाव फसला
एपीएमसी मार्केट परिसरातून तरुणाला अटक
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) ः एपीएमसी मार्केट आवारात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या कोकण कृती विभागीय पथकाने दोन लाख ८० हजारांचे एमडी जप्त केले आहे.
अमली पदार्थ टास्क फोर्सचे गस्ती पथक एपीएमसी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी तुर्भे सेक्टर १९ मधील पाम बीचलगत महापारेषण कार्यालयाजवळ आरोपी रमजान शेख (वय २५) हा तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर झडतीवेळी पांढऱ्या रंगाची भुकटी आढळून आली. या प्रकरणात एपीएमसी पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाईत २८ ग्रॅम वजनाचा दोन लाख ८० हजार रुपयांचे अमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन असा दोन लाख ९० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ कोणासाठी आणले होते, याची चौकशी सुरू आहे.