फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी फरार पोलिसाचं आत्मसमर्पण, आतापर्यंत काय माहिती समोर आली?
BBC Marathi October 26, 2025 06:45 PM
BBC/getty Images

साताऱ्याच्या फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणातील संशयित फरार आरोपी पीएसआय गोपाल बदने याने आत्मसमर्पण केलं आहे. घटना समोर आल्यापासून हा संशयित आरोपी फरार होता आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

दरम्यान, शनिवारी (25 ऑक्टोबर) बदने स्वत: फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

फलटणमधील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तळहातावरच लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या महिलेनं एका पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत.

या सुसाईड नोटमध्ये तिने पोलीस अधिकाऱ्यांसह आणखी एका व्यक्तीवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

या प्रकरणामुळं सातारा जिल्ह्यात खळबळ माजली असून या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, यातील पीएसआय असलेला संशयीत शनिवारी स्वत:हुन फलटण पोलिसांसमोर हजर झाला.

तर त्याआधी प्रशांत बनकर नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलंय?

या महिला डॉक्टरने काल गुरुवारी (23 ऑक्टोबर) फलटणमधील एका हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली.

तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचं तसेच आणखी एका व्यक्तीचं नाव लिहिलं आहे.

त्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला, तर दुसऱ्या व्यक्तीने आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला असल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं केला आहे.

या महिला डॉक्टरवर चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स बनवण्यासाठी राजकीय तसेच पोलिसांकडूनही प्रचंड दबाव असायचा, अशी माहिती तिच्या भावाने दिली आहे.

तिला अशा खोट्या रिपोर्ट्ससाठी खासदाराच्या पीएंकडूनही फोन यायचा, असाही आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

BBC फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणातील फरार असलेला संशयीत आरोपी पीएसआय बदने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना तिच्या भावाने म्हटलं की, "मागील वर्षभरापासून तिला चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय तसेच पोलीसांचं खूप प्रेशर असायचं. ती तिच्या बहिणीला यासंदर्भात वारंवार सांगायची.

परंतु, तिच्यावर एवढा दबाव असेल, असं वाटलं नव्हतं. परंतु, शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला ते सहन न झाल्याने तिने काल आत्महत्या केली आहे."

पुढे त्यांनी म्हटलंय की, "ज्या पोलीस अधिकाऱ्याचा तिला त्रास होत होता, त्यांचीही नावे तिने हातावर लिहिली आहेत. तसेच, यासंदर्भात तक्रार करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून तिने डिवायएसपी आणि एसपींना लेटर्सही लिहिले आहेत.

त्यांची आवक-जावक नोंदही झालेली आहे. परंतु, तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई आजवर झालेली नाही. तसेच, काही माहिती मिळवण्यासाठी तिने आरटीआयही टाकला होता, त्यावरही तिला काही प्रतिसाद मिळाला नाही."

एक आरोपी अटकेत, फरार पीएसआयचं आत्मसमर्पण

ज्या दोन व्यक्तींची नावे या पीडित महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यापैकी प्रशांत बनकर या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर दुसऱ्या आरोपीने स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. तो शनिवारी फलटण पोलिसांत स्वत: हजर झाला.

प्रशांत बनकर या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. फलटण पोलिसांनी ही कारवाई केली असून अटक केल्यानंतर त्याला फलटणच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं.

त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यातील ज्या पोलीस अधिकाऱ्यावर चारवेळा बलात्कार करण्याचा आरोप पीडित महिला डॉक्टरने केला आहे, त्याला निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.

BBC

सध्या दोन्हीही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "या प्रकरणी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. या महिला डॉक्टरने स्वत:च्या हातावर दोन नावे लिहून ठेवली आहेत. त्यात फलटण ग्रामीणचे पीएसआय आणि एका नागरिकाचा उल्लेख केला आहे.

या महिला डॉक्टरने शारीरिक आणि मानसिक छळाचा तसेच बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असंही लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणं अशा दोन कलमांखाली हा गुन्हा नोंद आहे. आरोपींना पकडण्याकरता पथक रवाना करण्यात आलेलं आहे. पीएसआयवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना तत्काळ सस्पेंड करण्यात आलं आहे."

BBC

'आम्ही सांगू तसा रिपोर्ट आम्हाला द्यावा, यासाठी दबाव टाकला जातोय', अशी तक्रार या महिला डॉक्टरने केली होती का? या प्रश्नावर पोलिसांनी म्हटलं की, "त्यांनी तत्कालीन एसडीपीओंकडे पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली होती. अशा दोन्ही परस्पर एकमेकांविरोधात तक्रारी झालेल्या आहेत.

या महिला डॉक्टरवर खासदारांच्या पीएकडूनही दबाव टाकला जात होता, असा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय.

तर राजकीय दबावाच्या दृष्टीनेही तपास होतोय का? या प्रश्नावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, "सध्या तर एक अनैसर्गिक मृत्यू झालेला दिसतोय. प्रथमदर्शनी ती आत्महत्या दिसते आहे.

ती आत्महत्याच आहे, हे आधी सिद्ध करावं लागेल. त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय, हे शोधावं लागेल. त्यामध्ये महिलेनं काय लिहिलंय, कुणासोबत आधी काय बोलणं झालंय, या सगळ्याचा तपास होणार."

'तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही'

या महिला डॉक्टरने आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत वारंवार लिखित आणि रितसर तक्रारी केल्या होत्या. तरीही तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, अशी माहिती तिच्या काकांनी तसेच भावानेही माध्यमांशी बोलताना दिली आहे.

या महिला डॉक्टरने 19 जून 2025 रोजी फलटणच्या पोलीस उपअधीक्षकांना रितसर पत्र लिहून तक्रार केली होती.

BBC

या पत्रामध्ये या महिलेने लिहिलं की, "पेशंट (आरोपी) फीट नसतानाही तो फीट आहे, असा रिपोर्ट द्या, असा वारंवार दबाव माझ्यावर टाकतात आणि अपशब्दही वापरतात. यासंदर्भात मी पोलीस निरिक्षक यांना फोनद्वारे माहिती दिली असतान त्यांनी 'त्यामध्ये माझा काही संबंध नाही' असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली," असाही आरोप तिने या तक्रारीमध्ये केला होता.

या तक्रारीची कोणतीच दखल न घेतली गेल्याने महिला डॉक्टरने 13 ऑगस्ट रोजी माहिती अधिकारांतर्गत आरटीआयदेखील दाखल केला होता.

आपल्या तक्रारीचं पुढे काय झालं, याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न या आरटीआयद्वारे महिला डॉक्टरने केला होता.

पण त्या आरटीआयलाही काही उत्तर प्राप्त झालं नसल्याचं या महिलेच्या भावाने सांगितलं आहे.

त्यानंतर आणखी एका पत्रात या महिलेने पुन्हा सविस्तर वर्णन करत आपल्या तक्रारी मांडल्या होत्या.

महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, "महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे.

या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले."

या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात माहिती देणारा एक व्हीडिओ पोस्ट केला असून त्यांनी म्हटलंय की, "राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे."

"पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत," असंही त्यांनी म्हटलेलं आहे.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • भारतातील सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट, वयोवृद्धाची 58 कोटींहून अधिक फसवणूक; नक्की प्रकरण काय?
  • सायबर गुन्हेगारांनी रचला 'डिजिटल सापळा', पण सजगतेमुळे 'असे' वाचले आजोबांचे 15 लाख रुपये
  • जेलमधून बहिणीचं लग्न, बुलेटची खरेदी; कैदी आणि कर्मचाऱ्यांचा जेलमधूनच 52 लाखांचा घोटाळा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.