ठाण्याच्या हिरव्या हृदययाला प्रदूषणाचा विळखा
esakal October 26, 2025 07:45 PM

ठाण्याचा श्वास गुदमरला
फटाक्यांच्या धुराने वाढला एक्यूआय; दिवाळीनंतरही प्रदूषण कायम
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) ः ठाण्याचे हिरवे हृदय म्हणून ओळखला जाणारा उपवन परिसर फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषित झाला आहे. ठाणे शहरातील फटाक्यांची आतषबाजी कमी झालेली असतानाही हा भाग अजूनही प्रदूषणाच्या छायेत आहे. परिणामी या परिसरातील श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे. सध्या येथील वायू प्रदूषण १५० एक्यूआयच्या पुढे असून, गेल्या तीन दिवसांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सान्निध्यात असलेला हा भाग प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.
येऊरच्या पायथ्याशी असलेला उपवन परिसर शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात ठाणेकर वॉक करण्यासाठी येतात. मात्र दिवाळीच्या दिवसांमध्ये हा परिसर हवेच्या प्रदूषणात सापडला आहे. ठाणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात येथे सायंकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी येतात. तलावाच्या चारही बाजूंनी विविध प्रकारचे फटाके फोडले जातात. त्यामुळे हा परिसर प्रचंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. दिवाळीच्या पहिला दिवशी तर हा परिसर ऑरेंज झोनमध्ये (धोकादायक स्थिती) आला होता. येथील हवा २१३ एक्यूआयपर्यंत खराब झाली होती. आता गेल्या दोन दिवसांपासून येथील फटाके फोडण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले असल्यामुळे हवेतील प्रदूषणदेखील काही प्रमाणात कमी झाले आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
हवेतील प्रदूषण मोजण्याकरिता ठाण्यात उपवन आणि कासारवडवली परिसरात दोन प्रदूषण मापक यंत्रे बसवण्यात आली आहेत. यातील उपवन परिसरातील यंत्राने ठाण्यात सर्वाधिक हवा प्रदूषित असल्याचे दाखवले आहे. तर कासारवडवली येथे बसविण्यात आलेल्या यंत्राने गेल्या दोन दिवसांपासून येथे शुद्ध हवा असल्याचे दाखवून दिले आहे.

उपवन परिसरातील हवेचे प्रदूषण प्रमाण :
बुधवार - १५८
गुरुवार - १५१

कासारवडवली :
बुधवार - ५८
गुरुवार - ४७

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.