पक्ष भाजपमध्ये विलीन करा, मोदी-शहांनी शिंदेंना आदेश दिल्याचा राऊतांचा दावा; दिल्ली दौऱ्यावरून टीका
esakal October 26, 2025 10:45 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं दीडशे पारचा नारा दिलाय. जवळपास स्वबळाच्या घोषणाच केल्या जात आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे तातडीने शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घ्यायला गेले होते अशी माहिती समजते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. दिल्लीत भेटीवेळी मोदी आणि अमित शहा यांनी शिंदेंना पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा आदेश दिला असल्याचा दावा राऊतांनी केला.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्या सुनावणीची तारीख जेव्हा जेव्हा जवळ येते तेव्हा शिंदेंचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीत जातात असा टोलाही राऊतांनी लगावला. दिल्लीत जाऊन रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात असंही संजय राऊत म्हणाले, शिंदेंना त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते. शिवसेनेत असताना मातोश्री किंवा शिवसेना भवनात यावं लागायचं. शिवसेना त्यांना कळत नाही. चोरलेला पक्ष असल्यानं त्यांना इतिहास माहीत नाहीय अशा शब्दात राऊतांनी टीका केली.

Satara : महिला डॉक्टर हॉटेलवर का गेली? मध्यरात्री दीड वाजता 'चेक इन', २ दिवसाचं बूकिंग; दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाचं नेतृत्व हे राज्यातच असतं. पक्षांची मुख्य कार्यालयेसुद्धा दिल्लीत असतात. चंद्राबाबू नायडु हे त्यांच्या पक्षाचं काम दिल्लीत घेऊन जात नाहीत. आता यांचे मालक दिल्लीत आहेत. त्यामुळे यांना दिल्लीला जावं लागतं असा टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जागावाटप यावरूनही संजय राऊतांनी शिंदेंवर प्रहार केला. राऊत म्हणाले की, मोदी, शहा यांना माहितीय की शिंदेंची प्रत्यक्ष ताकद काय आहे. आमच्या विरुद्ध महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात त्यांना वापरून घेतलं. आता त्यांना दिल्लीतून सल्ला देण्यात आलाय की महापालिकेच्या निवडणुका झाल्यावर पक्ष भाजपमध्ये विलीन करा.कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टात आपला बचाव करू शकत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.