भुयारी मेट्रोचा नुसताच गारेगार प्रवास; सुविधांची वाणवा!
esakal October 27, 2025 01:45 AM

भुयारी मेट्रोचा नुसताच गारेगार प्रवास; सुविधांची वानवा!
क्यूआर कोड स्कॅन होण्यास विलंब, स्वयंचलित जिने बंद
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मेट्रो-३च्या अखेरच्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर ९ ऑक्टोबरपासून आरे-कफ परेड ही संपूर्ण भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आल्याने गारेगार प्रवासाची पर्वणी मिळाली असली तरी सुविधांची मात्र वानवा आहे. मेट्रो प्रवासात मोबाईलला नेटवर्क नसणे, प्रवासानंतर बाहेर पडताना तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन न होणे, स्वयंचलित जिने बंद असणे, पुरेशा कचरापेट्यांचा अभाव, पिण्यासाठी पाणी नसणे अशा अनेक समस्यांचा प्रवाशांना गारेगार प्रवासानंतर सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवास करता यावा, यासाठी एमएमआरसीएलने सुमारे ३७ हजार कोटी रुपये खर्चून ३३ किलोमीटरचा भुयारी मेट्रो मार्ग सुरू केला आहे. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी आरे-बीकेसी हा पहिला टप्पा तर बीकेसी-वरळी हा दुसरा टप्पा ९ मे रोजी सेवेत आला आहे. तर तिसरा आणि अखेरचा टप्पा ९ ऑक्टोबरपासून सेवेत आला आहे. त्यामुळे आरे-कफ परेड या मार्गावर दररोज दीड-पावणे दोन लाख मुंबईकर प्रवास करीत आहेत. मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरही या मार्गावरील अनेक स्थानकांवर पुरेशा सुविधा सुरळीतपणे कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

मोबाईलला नेटवर्क येईना
- मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होऊन एक वर्ष उलटून गेले असून आता संपूर्ण मार्गिका सुरू झाली असतानाही प्रवाशांना मेट्रो स्थानक आणि गाडीत मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे तासाभराच्या या प्रवासात मुंबईकर पुरते नॉट रिचेबल होत आहेत. या भुयारी मेट्रो मार्गिकेवर नेटवर्कच मिळत नसल्याने प्रवाशांना स्थानकात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत ना कोणाचा फोन येतो, ना व्हाॅट्सॲपवर मेसेज येतो. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. ३३ किलोमीटरची भुयारी मेट्रो बनवली; पण एमएमआरसी साधी मोबाईल नेटवर्कची व्यवस्था का करू शकली नाही, असा सवाल प्रवासी करीत आहेत.
- मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी मेट्रोने तिकीट खिडकी परिसरात वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; मात्र त्याला कनेक्ट करण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच कनेक्ट झाल्यानंतरही तिकीट निघत नसल्याच्या प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत.

तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन होईना
मेट्रो प्रवासासाठी तिकीट काढल्यानंतर त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करून आत जावे लागते. प्रवास झाल्यानंतरही एक्झिट गेटवर प्रवाशांना तिकिटावरील क्यूआर कोड स्कॅन करून बाहेर पडावे लागते. सिद्धिविनायक स्थानक, गिरगाव आणि सीएसएमटी स्थानकातून बाहेर पडताना सहजपणे क्यूआर कोड स्कॅन होत नाही. त्यामुळे प्रवासानंतर बाहेर पडताना एक्झिट गेटवर प्रवाशांची गर्दी होत आहे. याबाबत सिद्धिविनायक स्थानकातील सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केली असता काही क्यूआर कोड व्यवस्थित येत नसल्याने वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वयंचलित जिने बंद
मेट्रो स्थानकातून बाहेर पडण्यासाठी सर्वच स्थानकात स्वयंचलित जिने आहेत; मात्र धारावी, बीकेसी, शितलादेवी, सिद्धिविनायक, दादर अशा बहुतांश स्थानकातील काही जिने बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना ५०-६० पायऱ्या चढून बाहेर पडावे लागते. अनेकदा स्वयंचलित जिना असल्याने प्रवासी त्याकडे जातात; मात्र तो बंद असल्याने त्यावरूनच पाय आपटत वरच्या दिशेने यावे लागते.

पाणी नाही, कचरापेट्यांचा अभाव
मेट्रोस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्या ठिकाणी पाणी नसते. धारावी, गिरगाव स्थानकात ही परिस्थिती असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
- प्रशस्त स्थानकात कचरापेट्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पाण्याची बाटली किंवा अन्य कचरा टाकण्यासाठी प्रवाशांना कचरापेटीचा शोध घ्यावा लागत आहे.

मेट्रोचा गारेगार प्रवास चांगला आहे; पण अनेक सुविधांची वानवा आहे. स्थानकात कचराकुंड्या नाहीत. एका ठिकाणी चार-पाच तिकीट खिडक्या असल्या तरी कार्यरत एकच असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी रांग लावावी लागते. ऑनलाइन तिकीट काढण्याच्या मशीन बंद असतात. स्वयंचलित कुलरमध्ये पाणी नसणे आदी समस्या असून त्याची मेट्रो प्रशासनाने दाखल घ्यावी.
- प्रणय पाटकर, प्रवासी

मेट्रोमुळे नागरिकांसाठी सुरक्षित आणि जलद प्रवास उपलब्ध झाला आहे. मेट्रोचे प्लॅटफॉर्म पाच-सहा मजले खाली आहेत. उतरताना पायऱ्यांवरून फारसा त्रास होत नाही; परंतु खालून वर येताना एकदम वरील बाजूला असलेले स्वयंचलित जिने बंद असल्याने मोठी दमछाक होते. त्यामुळे हे सर्व जिने पूर्णवेळ चालू राहतील, याकडे मेट्रोने कृपया लक्ष द्यावे.
- सचिन शिरसोनकर, प्रवासी

मेट्रोच्या गारेगार प्रवासाबरोबरच प्रवाशांना अन्य सुविधा उपलब्ध असायला हव्यात. मोबाईलला नेटवर्क नसणे, कचरापेटी नसणे, स्वयंचलित जिने बंद राहणे, या बाबी किरकोळ असल्या तरी त्या आवश्यक आहेत; मात्र एमएमआरसीला त्याबाबत सोयरसुतक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.