फलटण महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, आता ते अधिकारीही अडचणीत, फडणवीसांचा थेट फोन अन्..
Tv9 Marathi October 27, 2025 01:45 AM

सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे, गुरुवारी फटणमधील एका रुग्णालयातील महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, दरम्यान मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळ हातावर एक सुसाईड नोट देखील लिहिली होती, ज्यामध्ये तीने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केला तर प्रशांत बनकर हा आपला शारीरीक आणि मानसिक छळ करत होता, असा आरोप या डॉक्टरने  सुसाईड नोटमध्ये केला आहे. दरम्यान या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी असलेल्या गोपाळ बदने याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर गोपाळ बदने यांचं निलंबन देखील करण्यात आलं आहे. पीडित कुटुंबाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधला आहे, या प्रकरणातील मास्टरमाइंड लवकरात लवकर शोधून काढू असं अश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कुटुंबाला दिलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मोहन जगताप यांनी आज या पीडित कुटुंबाची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केला, त्यावेळी फडणवीस यांनी या पीडित कुटुंबाशी संवाद साधला, यावेळी बोलताना या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधून काढू असं अश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. तसेच पिडीतेच्या तक्रारीवर चौकशी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होईल आणि जे कोणी या प्रकरणात सहभागी असतील  त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र प्रशांत बनकर यांच्या बहिणीने धक्कादायक दावा केला आहे, पीडित महिला डॉक्टरने आपल्या भावाला प्रपोज केलं होतं, असा दावा प्रशांत बनकर याच्या बहिणीने केला आहे. पीडित डॉक्टर महिला साधारण एक वर्षांपासून आमच्याकडे राहात होती, आमची चांगली मैत्री देखील झाली होती, असा दावा बनकर यांच्या बहिणीने केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.