आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पावसामुळे अखेर रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा सातवा आणि शेवटचा सामना होता. टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची 100 टक्के संधी होती. भारताने हा सामना जिंकलाच होता. मात्र पावसाला भारताचा पाचवा विजय पाहावला नाही. पावसाने सातत्याने सामन्यात विघ्न घातलं.त्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे हा सामना रद्द झाला.
वर्ल्ड कप स्पर्धेतील 28 व्या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसाने सामन्यात सुरुवातीपासूनच खोडा घातला. त्यामुळे टॉसला विलंब झाला. भारताने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पावसामुळे 35 मिनिटं विलंबाने टॉस झाला. त्यानंतर पावसामुळे काही तास वाया गेले. त्यामुळे सामना 43 ओव्हरचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पावसाने पुन्हा खोडा घातला. पाऊस मनसोक्त बरसला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सामना 27 ओव्हरचा करण्यात आला. बांगलादेशने 27 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 119 धावा केल्या.
बांगलादेशसाठी शर्मीन अक्टर हीने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर शोभना मोस्त्री हीने 26 रन्स केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 पार पोहचता आलं नाही. भारतासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्री चरणी हीने दोघींना आऊट केलं. तर रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. भारताला विजयासाठी 120 धावांचं आव्हान अपेक्षित होतं. मात्र भारताला डीएलएसनुसार 126 धावांचं सुधारित आव्हान मिळालं.
भारताची विजयी धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात झाली होती. प्रतिका रावल आणि अमनजोत कौर या सलामी जोडीने तडाखेदार सुरुवात केली.त्यामुळे भारत हा सामना 10 विकेट्सनेच जिंकणार, असं चित्र होतं. मात्र पावसाला सामना निकाली निघतोय, हे खटकलं असावं. त्यामुळे पावसाने भारताची बॅटिंग रोखत स्वत:ची बॅटिंग सुरु केली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. भारताने खेळ थांबवण्यात आला तोवर 8.4 ओव्हरमध्ये बिनबाद 57 रन्स केल्या होत्या. स्मृती 34 आणि अमनजोत 15 रन्सवर नॉट आऊट होत्या.
भारताला आता काहीच धावांची गरज होती. मात्र बराच वेळ पाऊस थांबण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र सर्वकाही नियंत्रणाबाहेर गेल्याचं लक्षात येताच सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. अशाप्रकारे बांगलादेश पराभवापासून वाचली. तर पावसाने भारताचा विजय हिसकावला.