जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
अंबरनाथ, ता. २५ (बातमीदार) ः शहरात बेकायदा तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असून, एकूण १३ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी, मंगळवारी (ता. २१) सायंकाळी अंबरनाथ पोलिसांनी विमको ग्राउंडजवळ धडक कारवाई करत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकानेही विमको नाका परिसरात एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सात जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून जुगार खेळल्याप्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली आहे.